नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमात ऑलिम्पिक स्पर्धेत 130 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्या 127 खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या संदर्भातील वृत्त एएनआय या वृत्तसंस्थेने दिले आहे. टोकियोमध्ये भारताचे 127 खेळाडू 18 क्रीडा प्रकारांत सहभागी झाले आहेत. लाल किल्ल्यावरील कार्यक्रमानंतर या खेळाडूंना पंतप्रधानांच्या निवासस्थानी आमंत्रित केले जाणार असल्याचेही सांगण्यात आले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार पंतप्रधान मोदी प्रत्येक खेळाडूची भेट घेणार असून त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत. भारताने यंदा आपला ऑलिम्पिकमधील सर्वांत मोठा चमू पाठवला असून त्यात 127 खेळाडूंसह 228 सदस्यांचा समावेश आहे. भारताला आतापर्यंत यंदाच्या ऑलिम्पिकमध्ये तीन पदके निश्चित झाली आहेत. यामध्ये वेटलिफ्टींगपटू मिराबाई चानूने पटाकविलेले रौप्यपदक, बॅटमिंटनपटू पी. व्ही. सिंधूच्या कांस्यपदकासहीत भारताची युवा बॉक्सिंगपटू लव्हलिना बोर्गोहेनने आपले पदक शुक्रवारी झालेल्या सामन्यामधील विजयासह निश्चित केले आहे.