Breaking News

सुधागडातील खुरावले फाटा ते वाघोशी रस्त्याची दुर्दशा

एका वर्षाच्या आत तब्बल अडीच कोटी रुपये पाण्यात

पाली : प्रतिनिधी

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून अडीच कोटी रुपये निधी खर्च करून सुधागड तालुक्यातील खुरावले फाटा ते वाघोशी या रस्त्याचे काम करण्यात आले होते. मात्र एका वर्षाच्या आत या रस्त्याची प्रचंड दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असून तो जागोजागी खचला आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणेदेखील जिकरीचे झाले आहे.

भेरव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेपासून दोनशे मीटरच्या अंतरापर्यंत आणि वाघोशी माध्यमिक विद्यालय ते वाघोशी गाव इथपर्यंतच्या रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे. भेरव येथील अंबा नदीच्या पुलाजवळ रस्त्यावरचा डांबर व खडीचा थर पाण्यात वाहून गेला आहे. अनेक ठिकाणी या रस्त्याची दुरावस्था झाली आहे.

या रस्त्याचे काम चालू असताना स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या निकृष्ठ कामाबद्दल आक्षेपदेखील घेतला होता. परंतु प्रशासनाचे दुर्लक्ष, संबंधित खात्याच्या अभियंत्यांची अनुपस्थिती व प्रशासनाची ठेकेदाराला असलेली साथ यामुळे रस्त्याच्या कामाची अशी दुरावस्था झाल्याचे सामाजिक कार्यकर्ते अमित गायकवाड यांनी सांगितले.

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून करण्यात आलेल्या  खुरावले फाटा ते वाघोशी या रस्त्याला दोन कोटी 49 लाख 12 हजार रुपयांचा निधी मिळाला होता. मात्र रस्त्याचे काम निकृष्ठ झाल्याने स्थानिक ग्रामस्थ संताप व्यक्त करीत आहेत.

रस्त्याचे काम मार्च महिन्यातच पूर्णत्वास आले आहे. रस्त्याच्या दुरावस्थेबाबत आम्ही ठेकेदारास वारंवार सांगत आहोत. परंतु याकडे ठेकेदार दुर्लक्ष करीत आहे. तरीसुद्धा ज्या ज्या ठिकाणी रस्त्याला खड्डे पडले आहेत व रस्ता खचला आहे त्याठिकाणी रस्ता व्यवस्थित करण्यात येईल.

-योगेंद्रकुमार मोकल, अभियंता, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply