Breaking News

नेरळमध्ये निर्माण झाले अनेक कचरा डेपो

कर्जत : बातमीदार

नेरळ ग्रामपंचायतीच्या आरोग्य विभागाकडे 100 कंत्राटी कामगार असूनदेखील शहराच्या काही भागात नवीन कचरा डेपो तयार झाले आहेत. रस्त्याने जाणारे नागरिक प्लास्टिक पिशवीत आणलेला कचरा नव्याने तयार झालेल्या कचरा डेपोत फेकून देतात. त्यामुळे या परिसरात दुर्गंधी पसरली आहे.

नेरळ हद्दीत ग्रामपंचायतीच्या 24 ठिकाणी कचरा कुंड्या आहेत. मात्र प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला कचरा टाकला जातो.   तेथे नव्याने बनलेल्या कचरा डेपोत नागरिक प्लास्टिक पिशवीतून आणलेला कचरा फेकून देतात.

नेरळ ग्रामपंचायतीकडे घंटागाडी आणि ट्रॅक्टर अशी साधने असून नागरीवस्तीत दररोज कचरा उचलला जात होता. मात्र अलिकडे घंटागाड्या येत नसल्याचे दिसून येत असून जागोजागी कचरा साठून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. ग्रामपंचायतीच्या बहुतेक सर्व कुंड्या कचर्‍याने ओसंडून वाहत असल्याचे दिसून येते. अनेक नागरिक घरातून बाहेर पडताना सोबत आणलेल्या प्लास्टिक पिशवीतील कचरा रस्त्याच्या कडेला फेकून देत असल्याचे दिसून येते. त्यामुळे नेरळपाडा येथील रेल्वे फाटक, निर्माण नगरी, एसटी स्टँड रोड, ममदापूर रोड, धरणाजवळ अशा काही ठिकाणी नवीन कचरा डेपो निर्माण झाले आहेत.  त्यातील रेल्वे फाटक, एसटी स्टँड रोड आणि मोहाचीवाडी पुलाच्या बाजूला टाकल्या जाणार्‍या कचर्‍यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. रेल्वे फाटक बंद असेल तर एकावेळी 100 वाहने  थांबून राहतात. या वाहनांतील प्रवाशांना या कचर्‍याच्या दुर्गंधीला सामोरे जावे लागते. तर मोहाचीवाडी पुलाखाली  आणि ममदापूर रोडला टाकण्यात येत असलेल्या कचर्‍यामुळे नेरळची स्वच्छ सुंदर अशी ओळख पुसून गेली आहे.

घंटागाड्या येणे बंद झाल्याने नेरळमध्ये कचरा साठून राहण्याचे प्रमाण वाढले आहे. पावसाळा असल्याने त्या कचर्‍यापासून दुर्गंधी निर्माण होत असून, त्यापासून वाचण्यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष द्यावे.

-प्रमोद कराळे, ग्रामस्थ, नेरळ

पावसाळ्यात कचरा कुंड्यांच्या बाहेर कचरा येऊ शकतो. पण पिशवीमधून आणलेला कचरा रस्त्याच्या कडेला फेकून देण्याची प्रथा पडली आहे, ती बंद झाली पाहिजे.

-गणेश गायकर, ग्रामविकास अधिकारी, नेरळ

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply