पनवेल : प्रतिनिधी
सायन-पनवेल महामार्गावरील खांदा कॉलनी येथील उड्डाणपुलाचे लोकार्पण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 19) करण्यात आले. हा पूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने या भागातील नागरिकांचा त्रास कमी होईल आणि वाहनचालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होईल, असे लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी उद्घाटन करताना म्हटले.
खांदेश्वर तलाव ते पळस्पे फाटा या भागात सतत वाहतूक कोंडी होत असल्याने नागरिक त्रस्त झाले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांनी या तीन किमी रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी शासनाकडे पाठपुरावा केल्याने 39 कोटी रुपयांचे काम मंजूर करण्यात आले. यामध्ये गाढी आणि काळुंद्री नदीवरील दोन पूल, 5 मोर्या आणि खांदा कॉलनी येथील भुयारी मार्ग यांचे काम हाती घेण्यात आले. गाढी नदीवरील पूल यापूर्वीच वाहतुकीस खुला झाला; तर काळुंद्री नदीवरील पूल महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईप लाईनमुळे रखडला होता. त्याचेही काम महिनाभरात पूर्ण होणार आहे.
खांदा कॉलनी येथील महामार्गावरील पुलाचे लोकार्पण मंगळवारी लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटन समारंभास पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी समिती अध्यक्ष मनोहर म्हात्रे, प्रभाग अध्यक्ष एकनाथ गायकवाड, नगरसेवक संजय भोपी, नगरसेविका सीताताई पाटील, पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.