सिडनी : वृत्तसंस्था
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा सामना 7 जानेवारीपासून सिडनी क्रिकेट मैदानावर, तर चौथा सामना ब्रिस्बेन येथील मैदानावर होणार आहे. यासाठी भारतीय खेळाडू सराव करीत असतानाच चौथ्या कसोटीसंदर्भात मोठे वृत्त समोर आले आहे. चौथ्या कसोटी सामन्यासाठी ब्रिस्बेनला न जाण्याचा निर्णय भारतीय संघाने घेतल्याचे वृत्त आहे. कारण ब्रिस्बेनमधील क्वारंटाइन नियम अतिशय कडक आहेत. भारतीय संघ दोन महिन्यांपासून ऑस्ट्रेलियात बायो बबलच्या नियमाचे पालन केले असतानाही इतक्या कडक क्वारंटाइनची गरज आहे का? जर नियम शिथिल करणार नसाल, तर ब्रेस्बेनला आमचा संघ पोहचणार नाही, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्ट केल्याचे वृत्त आहे. आयपीएलनंतर दुबईतून ऑस्ट्रेलियाला गेलेला भारतीय संघ 14 दिवसाच्या क्वारंटाइनमध्ये होता. त्यानंतर इतरांप्रमाणे स्वातंत्र्य मिळेले असे भारतीय संघाला वाटलेले, मात्र आता ब्रिस्बेनमध्ये भारतीय संघाला पुन्हा एकदा बायो बबलमध्ये जावे लागणार आहे. त्यामुळे खेळाडूंना हॉटेल ते स्टेडियम एवढाच प्रवास करता येईल. त्याव्यतिरिक्त कुठेही बाहेर जाण्यावर बंदी आहे. त्यामुळे भारतीय संघाने ब्रेस्बेनला जाण्याऐवजी सिडनीमध्येच राहायचे ठरवले आहे.