9 ऑगस्टच्या मोर्चाची जोरदार तयारी
नवी मुंबई ः प्रतिनिधी
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी क्रांतिदिनी 9 ऑगस्टला नवी मुंबईत मशाल मोर्चा काढण्यात येणार आहे. विमानतळाला ’दिबां’चे नाव द्यावे यासाठी भूमिपुत्रांच्या भावना तीव्र असतानाही राज्य सरकार याची दखल घेत नसल्याने सर्वपक्षीय कृती समिती पुन्हा एकदा एल्गार पुकारणार आहे, अशी माहिती नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र समन्वय समिती आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. राजेश पाटील यांनी दिली.
या पत्रकार परिषदेेस माजी खासदार डॉ. संजीव नाईक, भाजप जिल्हा अध्यक्ष डॉ रामचंद्र घरत, माजी नगरसेविका शुभांगी पाटील, नवी मुंबई सामाजिक पुनर्वसन संस्थेचे अध्यक्ष दशरथ भगत, समन्वक मनोहर पाटील, शैलेश घाग, दीपक पाटील, शीतल भोईर, साईनाथ पाटील, सुनील पाटील आदी उपस्थित होते.
मशाल मोर्चात नवी मुंबईच्या 29 गावांसह 12 पाड्यांतील हजारो नागरिक सहभागी होणार असून त्या पार्श्वभूमीवर नेरूळ से. 2मधील शिरवणे विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजमध्ये पत्रकार परिषद घेण्यात आली.
या वेळी डॉ संजीव नाईक यांनी सांगितले की, मशाल मोर्चाची सुरुवात जासईतील लोकनेते दि. बा. पाटील हुतात्मा स्मारक येथून होणार आहे. तेथे ‘दिबां’ना वंदन करून क्रांतीज्योत प्रज्वलित केली जाईल. त्यानंतर नवी मुंबईतील गावागावात मशाली प्रज्वलित केल्या जाणार आहेत. या वेळी राज्य शासनाच्या दडपशाहीचा निषेध केला जाणार आहे, तर शैलेश घाग यांनी मशाल मोर्चासाठी मशाली, बॅनर, झेंडे आदींची उपलब्धता समितीकडून केली जाणार असल्याचे सांगितले.