नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
जुलै महिन्यात पुराचा तडाखा बसलेल्या चिपळूण शहरात डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या माध्यमातून स्वच्छता मोहीम राबविण्यात आली होती. प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली 3106 श्रीसदस्यांनी या स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला होता.
22 जुलैला झालेल्या मुसळधार पावसात चिपळूण शहर तसेच तालुक्याला पुराच्या पाण्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले होते. हा चिखल हटविण्यासाठी प्रतिष्ठानचे श्रीसदस्य पुढे सरसावले होते. या वेळी या सदस्यांनी चिपळूण शहर, बाजारपेठ, खेर्डी, मुरादपूर, पेठमाप, गोवळकोट परिसरात पाच दिवस स्वच्छता अभियान राबवत परिसरातील कचरा, गाळ, चिखल तसेच तुंबलेली गटारेही स्वच्छ केली.
या स्वच्छता अभियानात प्रत्यक्ष रित्या 3106 श्री सदस्यांनी सहभाग घेत 26 वॉर्ड मधील 13 प्रभागमध्ये हे अभियान राबवत 21 किलोमीटर लांबीचे मुख्य, उपरस्ते तसेच परिसरातील तुंबलेली गटारेही साफ केली. या वेळी एकूण 1564 टन कचरा 34 ट्रॅक्टर व 60 डंपर व 5 जेसीबीच्या सहाय्याने उचलून पालिकेच्या डम्पिंग ग्राऊंडवर जमा करण्यात आला. या स्वच्छता अभियानात रत्नागिरी, रायगड, ठाणे व मुंबईतून श्रीसदस्य आपल्या स्वखर्चाने सहभागी झाले होते.
प्रतिष्ठानने राबविलेल्या या स्वच्छता मोहिमेबद्दल चिपळूणकर व्यापारी, ग्रामस्थ तसेच प्रशासनांनही आभार व्यक्त करत धन्यवाद दिले.