Breaking News

दिलासा! देशात कोरोनामुक्तीचे प्रमाण वाढले

पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा बरे होणार्‍यांची संख्या अधिक

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

देशात मागील काही दिवस सलग दररोज आढळणारी कोरोनाबाधितांची संख्यी ही कोरोनातून बरे झालेल्यांच्या तुलनेत अधिक आढळून आली होती. त्यानंतर पुन्हा एकदा देशभरात रोज आढळून येणार्‍या कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा करोनातून बरे झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसत आहे.

देशातील कोरोनाची दुसरी लाट अद्याप ओसरलेली नाही. शिवाय, तिसर्‍या लाटेची भीतीदेखील तज्ज्ञांनी वर्तवलेली आहे. अद्यापही रोज मोठ्या संख्येने नवीन कोरोनाबाधित आढळून येत असून, कोरोनाबाधितांच्या मृत्यू संख्येतही भर पडतच आहे. देशभरात रविवारी (दि. 8) सकाळी संपलेल्या 24 तासांत 43 हजार 910 रुग्ण कोरोनातून बरे झाले असून, 39 हजार 70 नवीन कोरोनाबाधित आढळले आहेत. याशिवाय, 491 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाल्याचीदेखील नोंद झाली आहे.

आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 3,19,34,455 झाली आहे. देशात 4,06,822 अ‍ॅक्टिव्ह रूग्ण असून, एकूण 4,06,822 जण कोरोनातून बरे झाले आहेत. तर, आजपर्यंत देशात 4,27,862 कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. याचबरोबर देशात आजपर्यंत 50,68,10,492 जणांचे लसीकरण झाले असून, यापैकी 55,91,657 जणांचे मागील 24 तासात लसीकरण झाले आहे.

जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन कंपनीच्या करोना प्रतिबंधक एक मात्रेच्या लशीला आपत्कालीन वापरासाठी परवानगी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मंडाविया यांनी काल(शनिवार) दिली आहे. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’च्या लशीला परवानगी देण्यात आल्याने करोनाविरोधातील भारताच्या लढ्याला बळ मिळेल, असे मंडाविया यांनी सांगितले आहे. जॉन्सन अँड जॉन्सन ही अमेरिकी औषध उत्पादक कंपनी आहे.

दरम्यान, कोरोनाचा उगम झालेल्या चीनच्या वुहानमध्ये पुन्हा फैलाव सुरु झाला आहे. वुहानमध्ये गेल्या काही दिवासात करोना रुग्ण वाढू लागले आहेत.

रायगडात नऊ लाखांहून अधिक जणांचे लसीकरण

अलिबाग : प्रतिनिधी

रायगड जिल्ह्यात आत्तापर्यंत नऊ लाख 24 हजार 002 जणांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. यात सात लाख 12 हजार 260 जणांनी पहिली लस घेतली आहे. तर दोन लाख 11 हजार 742 जणांनी लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत. म्हणजेच अजून पाच लाख जणांना लसीचे दुसरा डोस मिळणे शिल्लक आहे.

जिल्ह्यात पाच लाख 37 हजार 102 पुरुष, तीन लाख 86 हजार 789 महिला तर 11 इतर व्यक्तींना ही लस देण्यात आली आहे. लसीकरणासाठी कोविशिल्ड लसीचा प्रामुख्याने वापर केला जात आहे. जिल्ह्यात यातील आठ लाख 14 हजार 916 डोस सिरम इन्स्टिट्यूटची कोविशिल्डचे वापरण्यात आले आहेत. तर भारत बायोटेकच्या कोवॅक्सिन लसीचे एक लाख 13 हजार 298 डोस वापरण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील दोन लाख 15 हजार 831 ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना प्रतिबंधक लस घेतली आहे. 45 ते 60 वयोगटातील तीन लाख पाच हजार 622 जणांनी लस घेतली आहे. 18 ते 44 वयोगटातील दोन लाख 68 हजार 302 जणांनी लस घेतली आहे.  आरोग्य विभागातील 40 हजार 004 तर प्राधान्यक्रम गटातील 94 हजार 243 जणांनी लसीकरण करून घेतले आहे.

जिल्ह्याची लोकसंख्या 30 लाखांच्या आसपास आहे. त्यातुलनेत आत्तापर्यंत जवळपास नऊ लाख जणांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply