संकल्प फाऊंडेशन व संस्कार अॅक्टिविटी सेंटर यांनी दिला पूरग्रस्तांना मदतीचा हात
पनवेल : प्रतिनिधी
संकल्प फाऊंडेशन व संस्कार अॅक्टिविटी सेंटर कामोठे यांच्या संयुक्त विद्यमाने आमदार प्रशांत ठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त पूरग्रस्तांसाठी मदत उपक्रम राबविण्यात आला. गेल्या आठवड्यात महाड परिसरात महापुराने सगळेच उद्ध्वस्त केले आहे. दोन नद्यांच्या मध्ये सापडलेल्या ढालकाठी, बिरवाडी, भावे, वरंध या महाड तालुक्यातील पट्ट्यात अनेकांना या महापुराचा फटका बसला आहे. त्यामुळे या पट्ट्यातील नागरिकांना व शालेय विद्यार्थ्यांना वैशाली जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करणार्या कामोठेतील संकल्प फाउंडेशन यांच्या माध्यमातून कर्तव्यपूर्ती म्हणून मदत करण्यात आली.
या मदतीत वह्या, पुस्तके, कपडे, दप्तर, टिफीन बॉक्स, कंपास पेटी, पेन, पेन्सिल, रंगपेटी, लाँग बुक, ड्रॉइंग किट, औषधी, बिस्कीट, स्वच्छता सामग्री, महिलांसाठी साडी, ब्लँकेट, टॉवेल, इनर वेअर, सुका खाऊ, फळे, अशा विविध 22 वस्तूंचे किट या वेळी या संस्थांमार्फत सुमारे 240 कुटुंबांना देण्यात आले. या वेळी उपस्थित संस्थेच्या अध्यक्षा वैशाली जगदाळे यांनी परिसरातील हुशार व कलेची आवड असलेल्या मुलांशी संवाद साधला व त्यांच्या शैक्षणिक मदतीसाठी सहाय्य करण्याचे आश्वासन दिले, तसेच पूरग्रस्त शाळांमधील सर्व संगणक संच दुरूस्त करून देण्याचे सूतोवाच केले.
भावे या गावातील जाधव वाडी, पोळ वाडी, आदिवासी वाडी, सुतार वाडी, बौद्ध वाडी, चौधरीवाडी, गुरव वाडी, वजरवाडी, पदाचा कोंड, किये आदी, तसेच ढालकाठीमधील गणेशनगर वसाहत भागात संकल्प फाउंडेशनच्या माध्यमातून थेट बधितांच्या घरी मदत पोहचवण्यात आली. या शैक्षणिक साहित्य वाटप, आरोग्य प्रबोधन, स्वच्छता अभियान याचे नियोजन जिल्हा परिषद शाळा भावेचे मुख्याध्यापक अनिल चिनके, सुरेश कवडे, नागनाथ सरक यांनी केले, तसेच पारटवाड सर, मेंगडे सर, सुधीर सरक आदींनी सहकार्य केले. या वेळी संस्थेचे अध्यक्ष वैशाली जगदाळे, उपाध्यक्ष मनीषा सिंग, खजिनदार गायत्री माने, सदस्य संजीवनी राणी, मच्छिंद्र कणसे, सुरेश साहू, विकास मळेकर, तसेच भावे गावच्या सरपंच आशा जाधव, शिक्षक अमोल बुधवंत, समाजसेवक घाग साहेब, प्रकाश सूर्यवंशी, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.
आम्हाला मिळालेला निधी आणि देणगीदार यांनी टाकलेला विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी खर्या गरजवंतांच्या थेट घरी पोहचून आम्ही मदत सुपूर्द केली. संस्थेचे सदस्य यांनी या काळात घेतलेल्या अपार मेहनतीमुळे केवळ हे शक्य झाले.
-वैशाली जगदाळे, अध्यक्ष, संकल्प फाउंडेशन