नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीची कामगिरी जबदरदस्त आहे. जर विराटचे नशीब चांगले राहिले; तर भारतच हा विश्वचषक जिंकेल, असा विश्वास ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंग याने व्यक्त केला आहे. आयपीएलमध्ये यंदा दिल्लीला मार्गदर्शन करणार्या पाँटिंगने एका मुलाखतीमध्ये आपली मते दिलखुलासपणे व्यक्त केली.
2019 विश्वचषकाबद्दल प्रश्न विचारला असता पाँटिग म्हणाला की, इंग्लंड, न्यूझीलंड, भारत आणि ऑस्ट्रेलिया स्पर्धेत प्रबळ दावेदार आहेत. हे चौघेही उपांत्य फेरीपर्यंत असतील. त्याचप्रमाणे वेस्ट इंडिज आणि पाकिस्तानही या विश्वचषकात चांगली कामगिरी करू शकतात. या वेळी त्याने विराट कोहलीच्या खेळाचे कौतुक केले. ‘विराट कोहलीचा वनडेमधील रेकॉर्ड अविश्वसनीय आहे. तो अत्यंत उत्तम फलंदाजी करतो आहे. त्याच्यामुळेच भारताचा संघ मला अत्यंत खतरनाक वाटतो. जर विराटचं नशीब चांगले असेल तर भारतच हा विश्वचषक जिंकेल,’ असे पाँटिंगने सांगितले.
धोनीने गेल्या काही वर्षांत केलेली प्रगतीही वाखाणण्याजोगी आहे, असे पाँटिगने नमूद केले. ‘महेंद्रसिंह धोनी 2015 विश्वचषकानंतर निवृत्ती घेईल असे मला वाटले होते, पण तसे झाले नाही. त्याने त्याचा खेळ बराच सुधारला आहे. त्याची प्रगती अभूतपूर्व असून, कौतुकास्पद आहे, अशा शब्दांत त्याची पाँटिगने प्रशंसा केली.