Wednesday , February 8 2023
Breaking News

मंत्रालय की मद्यालय?

महाराष्ट्रातील कायदा आणि सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रकार आणखी किती वेळा पहावा लागणार आहे, कोण जाणे? ज्या ठिकाणाहून अकरा कोटी लोकसंख्येच्या महाराष्ट्राच्या कारभाराची मंत्रणा होेते, त्या मंत्रालयाच्या प्रांगणात दारुच्या बाटल्या सापडायला लागल्या आहेत. हा सारा प्रकार उघडकीस आल्यानंतर राज्यकर्त्यांनी त्याबद्दल दाखवलेली अनास्था आश्चर्यकारक म्हटली पाहिजे.

मंत्रालय हे लोकशाहीचे पवित्र मंदिर मानले जाते. लोकांनी लोकांसाठी निवडलेले सरकार येथूनच राज्याचा कारभार हाकत असते. या इमारतीमध्ये जनतेचे प्रश्न सुटावेत अशी अपेक्षा आहे. तेथे सामान्यांना कोणी उभे करत नाही आणि आवारात मात्र दारूच्या बाटल्यांचे ढीग सापडतात ही बाब लांछनास्पद आहे. मंत्रालयाच्या प्रांगणामध्ये अनेक सरकारी कार्यक्रम पार पडतात. त्या विशाल प्रांगणामध्ये एक त्रिमूर्तीची प्रतिमा आहे. या प्रतिमेच्या मागल्या बाजूला आडोशाला दारूच्या रिकाम्या बाटल्या आढळून आल्या. याचा अर्थ काही अज्ञात लोकांनी मंत्रालयात बसून गटारी अमावस्येची पार्टी केली असावी असा अंदाज सहज बांधता येतो. या महाभागांना गटारी साजरी करण्यासाठी मंत्रालयच कसे मिळाले हा एक कुतुहलाचा किंबहुना चेष्टेचा विषय ठरला आहे. मंत्रालय परिसरामध्ये अनेक दुरुस्तीची व देखभालीची कामे सुरू असतात. त्यानिमित्ताने कंत्राटी कामगारांचे सतत येणे-जाणे असते. त्यांच्यापैकीच कुणीतरी हा उद्योग केला असावा असा अंदाज वर्तवला जात आहे. तपासाअंती सत्य काय ते बाहेर येईलच. परंतु मंत्रालयासारख्या कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या परिसरामध्ये दारूच्या बाटल्या आल्याच कशा हाही प्रश्न आहेच. मंत्रालयात प्रवेश करणार्‍या सर्वांचीच कसून तपासणी होत असते. लोकनियुक्त प्रतिनिधी सोडले तर सर्वांनाच या तपासणीच्या चक्रातून जावे लागते. किंबहुना, मंत्रालयात प्रवेश मिळवणे अनेकदा सामान्यजनांना आव्हानात्मक वाटते. कामाचे अवघे तपशील दिल्यानंतर मिनतवारीने प्रवेशपत्र मिळू शकते. असे असताना दारूच्या बाटल्या सुरक्षा व्यवस्थेचा डोळा चुकवून मंत्रालयाच्या आवारापर्यंत पोचाव्यात, हे गौडबंगाल आहे. यामुळे पोलिसांच्या सजगतेबद्दल मोठे प्रश्नचिन्ह निर्माण होते. महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेची पुरती वाट लागली आहे हे तर सार्‍यांना दिसतेच आहे. नव्या सरकारच्या कारभारातील बहुतेक काळ हा कोरोना प्रतिबंधक निर्बंधांमध्ये गेला आहे हे विसरून चालणार नाही. ज्या राज्याचा गृहमंत्रीच ईडी आणि सीबीआयच्या चौकशीच्या फेर्‍यात अडकून आपल्या पदाला मुकतो, तेथील कायदा सुव्यवस्थेबद्दल काय बोलावे? कोतवालावरचाच विश्वास उडून गेल्यानंतर जनतेने सुरक्षेसाठी कोणाकडे पाहायचे असे अनेक प्रश्न निर्माण होत असताना महाविकास आघाडी सरकारमधील नेते डोळे मिटून स्वस्थ आहेत. ज्या राज्यामध्ये एका तरुणीच्या आत्महत्येप्रकरणी वनमंत्र्याला चंबुगबाळे आवरावे लागते आणि तरीही राज्यकर्त्यांच्या चेहर्‍यावरील रेषा देखील हलत नाही, हे पाहून कुठल्याही सुजाण नागरिकाला वेदना झाल्याशिवाय राहणार नाही. गंभीर गुन्ह्यांच्या बातम्या दररोज ऐकू येत आहेत. नाशिकमध्ये दोन बहिणींना जिवंत जाळल्याची घटना दोन दिवसांपूर्वीच घडली आहे तर औरंगाबादमध्ये एका प्रतिष्ठित कंपनीच्या मुख्याधिकार्‍याला प्रचंड मारहाण करण्यात आल्याची घटना घडली आहे. अशा वातावरणात उद्योजकांनी महाराष्ट्रात रहावे कशाला असा सवाल उद्योजक करू लागले आहेत. मंत्रालयात दारूच्या बाटल्या आढळून येणे हे प्रतिकात्मक मानायला हवे. ढिसाळ कारभाराचे हे द्योतक आहे.

Check Also

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या पुतळ्याचे अनावरण

पनवेल : वार्ताहर परमपूज्य स्वामी अक्षयानंद सरस्वती महाराज यांच्या प्रेरणेने अक्षयधाम मंदिराचा आठवा वर्धापन दिन …

Leave a Reply