Breaking News

राज्यसभेत विरोधकांचा धिंगाणा

नक्राश्रू गाळू नका, देशाची माफी मागा -भाजप

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था
विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत बुधवारी मोठा गदारोळ केला. यानंतर त्यांनी महिला खासदारांना धक्काबुक्की झाल्याचा आरोप सरकारवर केला. भाजपने मात्र गुरुवारी (दि. 12) पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोप फेटाळले.
या पत्रकार परिषदेला केंद्रीय मंत्री पीयूष गोयल, अर्जुन मेघवाल, धर्मेंद्र प्रधान, भूपेंद्र यादव, व्ही. मुरलीधरन, अनुराग ठाकुर आणि प्रल्हाद जोशी उपस्थित होते.
या वेळी माहिती देताना केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी सांगितले की, विरोधकांना जनतेचे हित किंवा करदात्यांचा पैसा किंवा संविधानाच्या मूल्यांची कोणतीच चिंता नव्हती. विरोधकांचा संसद ते रस्त्यापर्यंत एकमेव अजेंडा हा फक्त अराजकता निर्माण करण्याचा आहे. जे घडले ते खूपच लज्जास्पद होते. विरोधकांनी नक्राश्रू ढाळण्यापेक्षा देशाची माफी मागायला हवी.
संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी म्हणाले की, विरोधी पक्षाच्या खासदारांनी राज्यसभेत गदारोळ केला. सभागृहात काचा फोडल्या. यात एक महिला कर्मचारी जखमी झाली. गैरवर्तवन करणार्‍या खासदारांविरोधात कारवाई करावी, अशी मागणी जखमी महिला कर्मचार्‍याने लेखी स्वरुपात केली आहे. विरोधकांनी बाकांवर चढून गदारोळ केला. त्या वेळी राज्यसभेत कुठलेही विधेयक मंजुरीसाठी मांडलेले नव्हते. फक्त चर्चा सुरू होती. शांततेचे आवाहन करूनही विरोधकांनी ऐकले नाही.
सरकारला सात वर्षे होऊनही विरोधक जनतेचा कौल स्वीकरण्यास तयार नाही. आमची जागा होती आणि मोदींनी ती हिसकावली, असे खासकरून काँग्रेसला वाटतेय. त्यांच्या याच मनसिकतेमुळे ही अशा गोष्टी घडत आहेत, असेही जोशी यांनी म्हटले.
राज्यसभेत विरोधकांनी जे वर्तन केले त्यामुळे सभागृहाच्या प्रतिष्ठेचा ठेच पोहोचली. सभापतींवर विनाकारण काहीही आरोप करण्यात आले. यामुळे सभातीपपदाच्या प्रतिष्ठेलाही धक्का बसला. अतिशय लाजीरवाण्या वर्तनाचे प्रदर्शन विरोधी पक्षांनी केले. विरोधकांचा हेतू स्पष्ट होता. त्यांना कामकाज शांततेत चालू द्यायचे नव्हते, असा आरोप केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी केला.
विरोध करणे हा विरोधकांचा अधिकार आहे, पण त्यातही काही शिष्टाचार असतो. ते जे काही करत होते ते राज्यसभा टीव्हीने जनतेला दाखवायला हवे होते. विरोधकांचे असभ्य वर्तन हे जनतेला दाखवायला हवे होते. विरोधक आता जनतेची दिशाभूल करून कारवाईपासून वाचण्याचा प्रयत्न करीत आहेत, असेही गोयल म्हणाले.

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply