Breaking News

खालापुरातील जैविक कचरा प्रक्रिया कारखान्याची जनसुनावणी रद्द

एसएमएस कंपनीविरोधात लढा सुरूच ठेवणार, ग्रामस्थांचा इशारा

खोपोली, खालापूर : प्रतिनिधी

खालापूर तालुक्यातील आत्करगाव येथे जैविक कचर्‍यावर प्रक्रिया करणारा (एसएमएस) कारखाना येवू घातला आहे. त्यासंबंधीची जनसुनावणी जिल्हाधिकार्‍यांकडून शुक्रवारी (दि. 13) घेण्यात येणार होती, मात्र ग्रामस्थांचा तीव्र विरोध पाहून ही जनसुनावणी रद्द करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केला आहे. मात्र या  एसएमएस कारखान्याविरोधातील लढा भविष्यात सुरूच ठेवण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

रूग्णालयातील जैविक कचर्‍याची विल्हेवाट लावणारा एसएमएस नावाचा कारखाना आत्करगांव येथे येेेेऊ घातला आहे. या जागेपासून 200 मी अंतरावर गाव नदी तसेच 500 मी अंतरावर पाझर तलाव, आत्करगांव, आडोशी, चिंचवली, टेंबेवाडी, होनाड, कुंभेवाडी, आत्करगांववाडी, बौध्दवाडा, जंगमवाडी आदी गावे आहेत. सदर कारखाना उभारल्यास कुजलेल्या कचर्‍यामुळे दुर्गधी पसरेल, तसेच जलप्रदुषण होऊन परिसरातील ग्रामस्थांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होवू शकतो. त्यामुळे 16 मार्च 2020 रोजी झालेल्या विशेष ग्रामसभेत ग्रामस्थांनी या कारखान्याला विरोध दर्शविला होता. त्यानंतर ना हरकत दाखला रद्द करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता.  

साजगांव पंचक्रोशीतील पाच ग्रामपंचायतीचा विरोध असतानाही एसएमएस कारखान्याबाबत शुक्रवारी जनसुनावणी लावण्यात आली होती, तिला जोरदार हरकत घेण्यत आली होती. मात्र ग्रामस्थांचा विरोध लक्षात घेवून ही जनसुनावणी रद्द करण्यात आली. त्यामुळे ग्रामस्थांनी कंपनीच्या फाटकासमोर जमून आनंद साजरा केला.

Check Also

पनवेल महापालिकेच्या विविध विकासकामांचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन

पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका महाराष्ट्र राज्य, देश अशा सर्व स्तरावर पुढे जाण्यासाठी आगेकूच …

Leave a Reply