Breaking News

स्वातंत्र्य दिनी करू या आर्थिक स्वातंत्र्याचा संकल्प!

देशात राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्य जेवढे महत्त्वाचे आहे, तेवढेच वैयक्तिक आणि कौटुंबिक जीवनात आर्थिक स्वातंत्र्य महत्त्वाचे आहे. आर्थिकदृष्ट्या आपण स्वतंत्र असलो पाहिजे, अशी प्रत्येक नागरिकाची इच्छा असते. ती फलद्रूप होण्यासाठी आर्थिकदृष्ट्या साक्षर होणे अपरिहार्य आहे.

आज आपण 75वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत. स्वातंत्र्याच्या या साडेसात दशकांत राजकीय आणि सामाजिक स्वातंत्र्याची चर्चा सतत होते आहे आणि ती झालीच पाहिजे, मात्र नागरिकांच्या वैयक्तिक आयुष्याच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या आर्थिक स्वातंत्र्याची चर्चा त्या प्रमाणात अजिबात होत नाही. आर्थिक आणि सामाजिक विषमतेची चर्चा झाली नाही असा दिवस शोधून सापडणार नाही, पण आर्थिक स्वातंत्र्य सर्व नागरिकांना मिळावे यासाठी नेमके काय केले गेले पाहिजे याची पुरेशी चर्चा होत नाही. त्यामुळे आजच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त ती चर्चा करणे संयुक्तिक ठरेल.

आर्थिक साक्षरतेचे महत्त्व

अर्थकारण किंवा अर्थाला आपल्या आयुष्यात आलेले महत्त्व आज कोणीही नाकारू शकणार नाही. स्वातंत्र्याच्या सात दशकात आपल्या देशाने सर्व क्षेत्रात मोठी मजल मारली आहे, पण जेव्हा मुद्दा आर्थिक विषमतेचा येतो तेव्हा ती कमी करण्यास आपल्याला अजून पुरेसे यश आलेले नाही, हे आपल्याला कबूल करावे लागते. याचे कारण आपल्या देशात असलेला आर्थिक साक्षरतेचा अभाव. त्याचा फटका एक देश म्हणून तर आपल्याला बसतोच आहे, पण अनेकांच्या वैयक्तिक जीवनातील आर्थिक स्वातंत्र्य त्यामुळे हिरावले जाते आहे. याचा अर्थ देशाचे अर्थकारण आणि आपल्या आर्थिक स्वातंत्र्याचा अतिशय जवळचा संबंध असून त्याविषयीची साक्षरता वाढविणे हीच आजची खरी गरज आहे.

विकासाच्या प्रचंड संधी असलेला देश

आपला देश जगातील एक प्रमुख देश आहे आणि तो सर्व देशांपेक्षा वेगळा देश आहे हे सर्व जण जाणतात, मात्र एवढ्या मोठ्या देशाचे आकलन आर्थिक साक्षरतेअभावी होत नसल्याने या देशात ज्या प्रचंड संधी आहेत, त्यांचेही आकलन त्यापैकी अनेकांना होत नाही. उदा. आकाराने सातव्या क्रमांकाचा, लोकसंख्येच्या दृष्टीने दुसर्‍या क्रमांकाचा, गहू, तांदूळ, दूध अशा जीवनावश्यक वस्तूंच्या उत्पादनात आघाडीवर असलेला, 192 देशांत जगात पाचव्या क्रमांकाचा जीडीपी असलेला, आज जगात चौथ्या क्रमांकाचे परकीय चलन (621 अब्ज डॉलर) बाळगणारा, जगातील दहाव्या क्रमांकाचा शेअर बाजार असलेला, निर्यातीत पहिल्या 10 देशांत स्थान मिळविण्यासाठी सज्ज झालेला आणि विकसित देशांशी अनेक क्षेत्रात बरोबरी करत असलेला आपला देश आहे. अशा या देशात आर्थिक विकासाच्या प्रचंड संधी आपली वाट पाहात आहेत. शेतीयोग्य प्रचंड जमीन असेल, अनेक देशांना नसलेली निसर्गाची साथ असेल, नागरिकांची सिद्ध झालेली बुद्धिमत्ता असेल आणि तेवढेच महत्त्वाचे राजकीय स्थैर्य असेल, अशा आर्थिक विकासासाठी अत्यावश्यक असलेल्या सर्व गोष्टी असल्याने एक मोठी झेप घेण्याची वेळ आता आली आहे. ती झेप घेण्यासाठी सर्वांत मोठा अडथळा आहे तो आर्थिक निरक्षरतेचा. ती दूर करण्याचे काम सरकार आणि रिझर्व्ह बँक करतेच आहे, पण जागरूक नागरिक या नात्याने आपणही त्यात सहभागी झाले पाहिजे.

जगात तिसर्‍या क्रमांकाची क्रयशक्ती

आपल्या देशातील अशा या प्रचंड संधीचे सोने करून आर्थिक समृद्धी मिळविणार्‍या नागरिकांची संख्या आज काही कोटींच्या घरात आहे. ती इतकी आहे की अशा चांगली क्रयशक्ती असलेल्या नागरिकांना आपले ग्राहक करण्यासाठी बहुराष्ट्रीय कंपन्यांची रांग लागली आहे. त्यांना काय हवे आहे, याचा शोध घेत कंपन्या भारतात येत आहेत. उदा. अमेझॉन कंपनीने भारतात स्वतंत्र कार्यालय सुरू केले आहे. क्रयशक्तीचा विचार करता भारत आज अमेरिका आणि चीननंतर जगात तिसर्‍या क्रमांकाचा देश आहे. याचा अर्थ आपल्या देशात मागणीही प्रचंड आहे. मागणीशिवाय अर्थव्यवस्था पुढे जाऊ शकत नाही. ज्या नागरिकांनी आपली आर्थिक स्थिती सुधारण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न केले ते आज आर्थिकदृष्ट्या समृद्ध आयुष्य जगत आहेत, पण त्याच वेळी रोजीरोटी आणि रोजगाराची चिंता करणार्‍यांची संख्याही आपल्या देशात अधिक आहे. त्यांची क्रयशक्ती खूप कमी आहे. ही स्थिती सुधारण्यासाठी नेमके काय केले पाहिजे?

आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांनी काय केले?

ज्यांना आपण श्रीमंत नागरिक म्हणतो किंवा ज्यांनी आपल्या वैयक्तिक किंवा कौटुंबिक जीवनात आर्थिक स्वातंत्र्य मिळविले आहे त्यांनी काय केले हे त्यासाठी पाहिले पाहिजे. तसे पाहिल्यास पुढील काही गोष्टी लक्षात येतात. 1. अशा नागरिकांनी शिक्षणात आणि त्यातही ज्या क्षेत्रात अधिक संधी आहेत अशा शिक्षणाचा फायदा घेतला आहे. (उदा. सध्या माहिती तंत्रज्ञान) 2. बँकिंग करून त्या व्यवस्थेचे सर्व फायदे त्यांनी घेतले आहेत. त्यांच्याकडेही एकेकाळी भांडवल नव्हते, पण त्यांनी बँकेत आपली आर्थिक पत निर्माण करून म्हणजे बँकिंग करून बँक कर्जाच्या रूपात तुलनेने स्वस्तात भांडवल मिळविले आहे. 3. नव्या गुंतवणुकीच्या मार्गाने त्यांनी आपल्या पैशाला चालायला लावले आहे. म्हणजे त्यातून परतावा घेऊन पैसा वाढविला आहे. (उदा. शेअर बाजार, म्युच्युअल फंड, विमा)  4. बदलत्या काळानुसार त्यांनी स्वत:ला बदलले आहे. म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा त्यांनी शक्य तेवढा फायदा घेतला आहे. (उदा. डिजिटल व्यवहार) 5. कमाईच्या सुरुवातीच्या काळात त्यांनी स्थावर मालमत्ता, तसेच ऐशोआरामाच्या गोष्टीसाठी फार खर्च न करता त्या रकमेची भविष्यासाठी गुंतवणूक केली आहे. 6. आपल्या आयुष्यात आजारपण किंवा अपघाताने काही वाईट घटना घडली, तर त्याचा आर्थिक फटका बसू नये म्हणून त्यांनी कुटुंबाचा आरोग्य विमा सर्वप्रथम काढला आहे, तसेच टर्म विमा काढून कमावत्या व्यक्तीच्या अनुपस्थितीत ती आर्थिक उणीव भरून काढण्याचा प्रयत्न केला आहे. 7. पैसे दुप्पट करून मिळतात किंवा अधिक व्याज देतो अशी जाहिरात करणार्‍या फसव्या योजनांकडे त्यांनी अजिबात लक्ष न देता गुंतवणुकीचे संवैधानिक मार्ग आहेत त्यांचा अवलंब केला आहे. 8. कमाई होत असेलल्या काळातच पुढील आयुष्याच्या गरजांचा विचार त्यांनी केल्यामुळे त्यांचे राहणीमान निवृतीच्या काळातही चांगले राहिले आहे. 9. त्यांनी सामाजिक, राजकीय विचाराला महत्त्व दिले, मात्र आपल्या आर्थिक स्वातंत्र्यालाही त्यांनी तेवढेच महत्त्व दिले आहे. 10. देशाच्या अर्थकारणाकडे त्यांचे बारीक लक्ष असल्याने येणार्‍या संधीचा फायदा त्यांनी सर्वप्रथम घेतला आहे. (उदा. जागतिकीकरण, संगणकीकरण, इंटरनेट आणि डिजिटलायझेशनचा स्वीकार)

…आणि आपण काय केले पाहिजे?

अशा या श्रीमंतांची बरोबरी म्हणून नव्हे, पण आपल्या आयुष्यातील आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य मिळविण्यासाठी आपण काय केले पाहिजे, हे आपण पाहू. 1. सर्व व्यापार उद्योग संघटीत होत आहेत. याचा अर्थ मोठ्या कंपन्यांचा आणि आपला दैनंदिन संबंध वाढला आहे. त्यांच्याकडे जाणार्‍या संपत्तीमध्ये वाटा मिळविण्यासाठी गुंतवणुकीचे नवे मार्ग अनुसरले पाहिजेत. उदा. म्युच्युअल फंड, शेअर बाजार, 2. शेती व्यवसाय करणार्‍यांनी अधिक भांडवली खर्च न करता असा खर्च सोबतच्या शेती व्यावसायिकांशी शेअर केला पाहिजे. (उदा. ट्रॅक्टर) शेतीतील हानी टाळण्यासाठी पिकविमा काढलाच पाहिजे. 3. सोने खरेदी करणार्‍यांची संख्या आपल्या देशात प्रचंड आहे, पण आता थेट सोने घेण्याची गरज राहिलेली नाही. गोल्डईटीएफ, गोल्डफंडच्या मार्गाने सोन्यात गुंतवणूक करून सोने जवळ बाळगण्याची जोखीम कमी केली पाहिजे. 4. सर्व पैसा बँकिंगद्वारे वापरून आपली आर्थिक पत वाढविणे आणि त्या माध्यमातून भांडवलासाठी कर्जरूपाने स्वस्त व्याजदरात पैसा उपलब्ध होईल, असे पाहिले पाहिजे. 5. आपण इन्कमटॅक्सच्या कक्षेत येत असल्यास तो वाचविण्यासाठी चुकीच्या आणि अतिदीर्घकालीन गुंतवणुकीत पैसा न अडकवता इन्कमटॅक्स भरून आपल्याकडे वापरण्यासाठी पैसा राहील, असे नियोजन केले पाहिजे. 6. देशाच्या आर्थिक वाटचालीत नव्या संधी कोणत्या निर्माण होतात, त्यावर लक्ष ठेवून त्यानुसार बदल करण्याची तयारी केली पाहिजे. 7. सबका साथ सबका विकास, अशी घोषणा सध्याच्या सरकारने केली असून त्याअंतर्गत अनेक आर्थिक कार्यक्रम जाहीर करण्यात आले आहेत. त्या सर्वांचा फायदा घेतला पाहिजे. (उदा. जनधन, ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या योजना, असंघटीत कामगारांसाठीची निवृती वेतन योजना आदी.)

-यमाजी मालकर, ymalkar@gmail.com

Check Also

बेलपाडा येथील अनधिकृत झोपड्यांवर पनवेल महापालिकेची कारवाई

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका हद्दीतील बेलपाडा गावाच्या मागे डोंगरावर अचानक अनधिकृतपणे उभ्या राहिलेल्या …

Leave a Reply