Breaking News

मोदी है तो मुमकीन है -केंद्रीय मंत्री कपिल पाटील

पेणच्या मूर्तिकारांसह नागरिकांशी साधला संवाद

पेण : प्रतिनिधी

सामान्य कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदी हे करीत असून यामुळेच माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान मिळाले असल्याचे प्रतिपादन केंद्रीय पंचायतराज राज्यमंत्री कपिल पाटील यांनी मंगळवारी (दि. 17) पेण येथे केले.

केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांची जनआशीर्वाद यात्रा मंगळवारी पेणमध्ये आली असता भाजपचे आमदार रविशेठ पाटील यांच्या वैकुंठ निवासस्थानी या यात्रेचे स्वागत करण्यात आले. या वेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी मूर्तिकार व अन्य नागरिकांशी संवाद साधला.

भारतीय जनता पक्षाने सामान्य नागरिकांसाठी विविध योजना आणल्या असून याचे श्रेय खर्‍या अर्थाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आहे, त्यांनी सामान्य माणसाला नजरेसमोर ठेवून या योजना राबविण्यास सुरुवात केली आहे. पंचायत राज या खात्याच्या माध्यमातून ग्रामीण भागाचा विकासासाठी प्रयत्नशील असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्रात मंत्रिपद मिळाल्यानंतर जनतेचा आशीर्वाद घेण्यासाठी येथे आलो असून या प्रेरणेतून काम करण्यास प्रोत्साहन मिळणार असल्याचे ते म्हणाले. 14 व्या वित्त आयोगातून दोन लाख 292 कोटी व 15व्या वित्त आयोग दोन लाख 36 हजार कोटी निधीच्या माध्यमातून देशातील प्रत्येक ग्रामपंचायतीचा विकास साधून प्रवाहात आणण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ग्रामपंचायतींद्वारे ग्रामीण भागात होणारा विकास हा भाजपच्या माध्यमातून होत असल्याचे भावना ग्रामीण भागातील जनतेच्या मनात रुजविण्याचे काम भाजप कार्यकर्त्यांनी केले, तर पुढील काळात मोदीजींच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात पुन्हा एकदा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रीपदी असतील यात तिळमात्र शंका नाही, असा विश्वास ना. पाटील यांनी व्यक्त केला.

जनतेचा वाढता पाठिंबा हीच आमच्या यशाची नांदी असल्याचा टोला केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांनी विरोधकांना लगावला.  आगरी समाज हा विस्तृत पसरलेला असून या समाजाचा एक प्रतिनिधी म्हणून भूमिपुत्रांना न्याय देण्याचे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली. नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी मागणी केल्यानुसार पेण तालुक्याच्या विकासासाठी केंद्रातील माझ्या सहकार्‍याच्या मदतीने पेणच्या विकासासाठी  निधी मिळवून देण्याचे वचनही त्यांनी या वेळी दिले.

केंद्रीय मंत्री मंडळात ओबीसी, एससी, एसटी समाजाला न्याय देण्याचे काम पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केले आहे. कोकणातील माणसाने शिवसेनेला भरभरून दिले, परंतु  शिवसेनेने कोकणी माणसाच्या विकासासाठी काय केले? असा सवाल विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या वेळी केला. गोरगरीब जनतेचा विकास करण्याचे ध्येय्य समोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी काम करीत असल्याचे प्रतिपादन आमदार रविशेठ पाटील यांनी या वेळी केले. पेणच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पेणच्या नगराध्यक्षा प्रितम पाटील यांनी या वेळी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांच्याकडे केली.

माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार निरंजन डावखरे, आमदार गणपत गायकवाड, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील, भाजप युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते, उपाध्यक्ष वैकुंठ पाटील, पेण नगर परिषदेचे गटनेते अनिरुद्ध पाटील व नगरसेवक उपस्थित होते. भाजपचे जिल्हा सरचिटणीस मिलिंद पाटील यांनी सूत्रसंचालन केले.

Check Also

रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा

पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …

Leave a Reply