Breaking News

नवी मुंबई कोविड लसीकरण वेगात

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

कोविड लसीकरणाला वेग देताना कोणताही समाजघटक दुर्लक्षित राहू नये याकडे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विशेष लक्ष देण्यात येत असून बेघर निराधार नागरिक, तृतीयपंथी व्यक्तींचे तसेच रेड लाईट एरिया, कॉरी क्षेत्र अशा काहीशा दुर्लक्षित भागातील नागरिकांचे लसीकरण करण्यात येत आहे.

याशिवाय महानगरपालिका क्षेत्रातील विविध वृध्दाश्रमांमधील वयोवृध्द व्यक्तींकरिता तेथे जाऊन लसीकरण करण्यात आले आहे. तसेच आजारपणामुळे अथवा वृध्दापकाळामुळे अंथरूणाला खिळलेल्या व शारीरिक हालचाल करता न येणार्‍या व्यक्ती या महत्त्वाचा घटकाला घरोघरी जाऊन लसीकरण करण्याकडेही महानगरपालिकेने विशेष लक्ष दिले आहे.

जून महिन्याच्या सुरूवातीपासूनच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या निर्देशानुसार महापालिका क्षेत्रातील विविध आश्रमांमध्ये असलेल्या बेडरिडन व्यक्तींच्या लसीकरणाला सेक्टर 17 ऐरोली येथील प्रेमदान आश्रमापासून सुरूवात करण्यात आली. ज्यामध्ये प्रेमदान 109 निराधार, वयोवृध्द व विविध व्याधींनी ग्रस्त तसेच बेडरिडन महिलांना कोविड लसीकरण करण्यात आले. अशाच प्रकारे सेक्टर 8 ए सीबीडी बेलापूर येथील नर्मदा आश्रम व पारिजात आश्रमामधील 30 व्यक्तींना, सेक्टर 4 ऐरोली येथील साई सेवा आश्रमातील 10 व्यक्तींना, सेक्टर 1 कोपरखैरणे येथील स्वीट ओल्ड एज होम आणि सदानंद ओल्ड एज होम मधील 10 व्यक्तींना, सेक्टर 21 नेरूळ येथील गुरूकृपा ओल्डेज होममधील 33 व्यक्तींना, सेक्टर 48 नेरूळ येथील बेथल गॉस्पीक चॅरिटेबल ट्रस्ट मधील 30 व्यक्तींना, सेक्टर 17 नेरूळ येथील गुरूकृपा ओल्डेज होम मधील 9 व्यक्तींना तसेच वात्सल्य ट्रस्ट सानपाडा येथील 150 व्यक्तींना अशाप्रकारे विविध वृध्दाश्रमांतील एकूण 381 व्यक्तींना कोविड लसीकरण करण्यात आलेले आहे.

त्याचप्रमाणे जे रूग्ण अंथरूणाला खिळलेले आहेत व ज्यांना शारीरिक हालचाल करता येत नाही असे बेडरिडन रूग्ण लसीकरणापासून वंचित राहू नयेत याची काळजी घेत घरोघरी जाऊन त्यांचे लसीकरण करण्यास सुरूवात करण्यात आलेली आहे, या विशेष उपक्रमांतर्गात आत्तापर्यंत 169 बेडरिडन रूग्णांचे त्यांच्या घरी जाऊन लसीकरण करण्यात आलेले आहे.

पालिकेकडून दैनंदिन नियोजन

कोविड लसीकरणामध्ये कोणताही घटक दुर्लक्षित राहू नये याची काळजी घेत महानगरपालिकेच्या वतीने लसींच्या उपलब्धतेनुसार लसीकरणाचे दैनंदिन नियोजन केले जात आहे. एखाद्या कुटुंबात बेडरिडन रूग्ण असल्यास त्यांच्या लसीकरणासाठी कुटुंबियांनी नजिकच्या महापालिका नागरी आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा अथवा महानगरपालिकेच्या कोविड कॉल सेंटरच्या 022-27567460या क्रमांकावर संपर्क साधून बेडरिडन रूग्णाची माहिती द्यावी व बेडरिडन रूग्णांचे लसीकरण करून घ्यावे असे आवाहन महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्या वतीने करण्यात येत आहे.

केंद्रांच्या संख्येत वाढ

कोविडची संभाव्य तिसरी लाट लांबविण्यासाठी टारगेटेड टेस्टींगसारख्या प्रभावी उपाय करण्याप्रमाणेच या लाटेचा प्रभाव कमी करण्यासाठी लवकरात लवकर जास्तीत जास्त नागरिकांचे कोविड लसीकरण पूर्ण करण्याकरिता नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. यासाठी लसीकरण केंद्रांच्या संख्येत 91 इतकी वाढ करण्यात आली असून 110 हून अधिक केंद्रांचे संपूर्ण नियोजन करण्यात आलेले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply