Breaking News

हनीट्रॅपमध्ये अडकवून बांधकाम व्यावसायिकाला लाखोंचा गंडा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त

सोशल मीडियावर ओळख झालेल्या एका तरुणीने पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवले. त्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपये उकळले. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे. हनीट्रॅप म्हणजे आकर्षक व्यक्तींचा वापर करून एखाद्याची गुप्त माहिती किंवा त्याच्याकडून पैसे उकळणे होय.

केवळ नववी पास असलेली ही तरुणी सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत आहे. तिचा पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगतोय. पती कारागृहात गेल्यावर पतीच्या गुन्हेगार मित्रासोबत तिची ओळख झाली अन् यातूनच हनीट्रॅप करणार्‍या नव्या टोळीचा उदय झाला. अनेकजण त्यांचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रूला घाबरुन तर कोणी भीतीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले.

चार दिवसांपूर्वी मुंबईच्या एका व्यवसायिकाने पोलिसांत जाण्याचे धाडस केले. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने संपूर्ण हनीट्रॅप करणारी ही टोळी गजाआड केली. या टोळीने पनवेल येथील 31 वर्षीय व्यवसायिकाला मारहाण करत खंडणी उकळली होती. या घटनेंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली होती.

या प्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रवींद्र भगवान बदर (वय 26), सचिन भातुलकर, आण्णा साळुंके (वय 40), अमोल ढवळे (वय 32), मंथन शिवाजी पवार (वय 24) आणि 19 वर्षीय तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

या टोळीने अनेकांना हनीट्रॅपच्या माध्यमातून लुटल्याचा पोलिसांना संशय आहे, मात्र काही जण भीतीपोटी किंवा अब्रुला घाबरुन पुढे येत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, किंवा कोणाकडून खंडणी उकळली गेली असेल तर त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply