Breaking News

वदप गावातील तलाव ओव्हरफ्लो

परिसर जलमय; शेतीचे मोठे नुकसान

कर्जत : बातमीदार

कर्जत तालुक्यातील वदप गावातील तलावात राजनाल्याचे पाणी शिरून तलाव ओव्हरफ्लो झाल्याने आजूबाजूचा परिसर जलमय झाला असून, कडधान्याच्या शेतीला याचा मोठा फटका बसला आहे.

वदप ग्रामपंचायतीच्या मालकीच्या या तलावातील गाळ सुमारे दिड महिन्याभरापूर्वी काढण्यात आला होता. मात्र गाळ साफ करून झाल्यावर तलावातील अधिकचे पाणी बाहेर काढण्यासाठी जो आऊटलेट काढणे गरजेचे होते ते नीट काढण्यात आले नाही. तसेच तलावाच्या बाजूनेच वाहणार्‍या राजनाल्याचे बांधकाम निकृष्ट झाल्याने त्यातूनही तलावात मोठ्या प्रमाणात पाणी झिरपत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

राजनाल्याचे पाणी शिरून वदप गावातील तलाव ओव्हर फ्लो झाला आणि गावात तसेच आजूबाजूच्या शेतात पाणी शिरले. त्यामुळे शेतकर्‍यांनी लावलेली वाल, मूग, हरभरा, चवळी या कडधान्यांची शेती या पाण्यात वाहून गेली. परिणामी हातातोंडाशी आलेले पीक वाया गेल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत.

तलावातील पाणी गावात तसेच शेतात शिरल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले, तरी पाटबंधारे विभागाचे अधिकारी तिकडे फिरकलेच नाहीत. त्यामुळे ग्रामस्थ, शेतकरी संतप्त झाले आणि त्यांनी एकत्र येऊन प्रथम ग्रामपंचायत कार्यालय गाठले. व सरपंच नीरा विचारे यांच्याशी या संदर्भात चर्चा केल्यानंतर पाटबंधारे कार्यालयावर धडक देण्याचे ठरले. त्यानुसार शेतकरी निकेश पाटील, निलिकेशी दळवी, सार्थक भासे, दशरथ मुने, सुयोग पाटील, बाळकृष्ण पाटील, रुपेश पाटील, प्रथमेश पाटील, वरद पाटील आदी शेतकर्‍यांनी कर्जतमधील पाटबंधारे कार्यालय गाठले. मात्र तेथे उपअभियंता अजय कदम उपस्थित नसल्याने शाखा अभियंता भरत काटले यांना घेराव घालत शेतकर्‍यांनी जाब विचारला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply