Breaking News

संपूर्ण संघाचा मला अभिमान!

कर्णधार कोहलीकडून सहकार्‍यांचे कौतुक

लंडन ः वृत्तसंस्था
‘संपूर्ण संघाचा मला अभिमान आहे. लॉर्ड्सवर विजय मिळवणे हे प्रत्येक क्रिकेटपटूचे स्वप्न असते. प्रत्येकाने महत्त्वाच्या क्षणी खेळ उंचावल्याने हे साध्य झाले. इंग्लंडच्या संघाला 60 षटकांत गुंडाळू याची खात्री होती. वेगवान गोलंदाजांच्या जिगरबाज वृत्तीला माझा सलाम,’ अशा शब्दांत भारताचा कर्णधार विराट कोहली याने सहकार्‍यांची पाठ थोपटली.
लॉर्ड्सवर झालेल्या दुसर्‍या कसोटीत कोहलीच्या नेतृत्वाखाली भारताने इंग्लंडला 151 धावांनी धूळ चारली. दुसर्‍या डावात गोलंदाज मोहमद शमी आणि जसप्रीत बुमरा यांनी नवव्या गड्यासाठी रचलेली 89 धावांची भागीदारी भारताच्या विजयात मोलाची ठरली. यादरम्यान ऑली रॉबिन्सन आणि जोस बटलर अनेकदा शमी-बुमरा यांना डिवचताना आढळले. यावर बोलताना भारतीय कर्णधार कोहली म्हणाला की, शमी आणि बुमरा फलंदाजी करीत असताना इंग्लंडच्या खेळाडूंनी त्यांना डिवचले. त्यामुळे शमी-बुमराची कामगिरी अधिक उंचावली आणि आपोआपच सर्व खेळाडूंमध्ये ऊर्जेचा संचार झाला, असे कोहली म्हणाला.
‘दुसर्‍या डावात शमी-बुमरा यांनी केलेली भागीदारी निर्णायक ठरली. त्यांना इंग्लंडच्या खेळाडूंनी विनाकारण डिवचल्यामुळे मीसुद्धा ड्रेसिंग रूममध्ये संतप्त झालो, मात्र तेथून शमी-बुमरा यांनी सुरेख फलंदाजी केली आणि मग गोलंदाजीसाठी मैदानावर उतरताच त्यांनी इंग्लंडची त्रेधातिरपीट उडवली. त्यांचा जोश पाहून संघातील प्रत्येक खेळाडूचा आत्मविश्वास बळावला,’ असेही कोहलीने सांगितले.
सामनावीर के. एल. राहुलनेसुद्धा संघाच्या झुंजार वृत्तीचे कौतुक करताना स्वतःच्या फलंदाजीत मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड यांच्या मार्गदर्शनामुळे आमूलाग्र बदल झाले आहेत, असे सांगितले.
तळाच्या फलंदाजांना कमी लेखणे भोवले -रूट
दुसर्‍या डावात भारताच्या आघाडीच्या फळीला लवकर बाद केल्यानंतर तळाच्या फलंदाजांना कमी लेखणे आम्हाला महागात पडले, अशी कबुली इंग्लंडचा कर्णधार जो रूटने पराभवानंतर दिली. या पराभवाची मी पूर्णपणे जबाबदारी घेतो. अखेरच्या दिवशी आम्ही भारतावर वर्चस्व मिळवले होते, पण ऋषभ पंतला बाद केल्यावर आमच्या गोलंदाजांनी स्वैर मारा केला. तळाचे फलंदाज स्वतःहून आपली विकेट फेकतील, असे आम्हाला वाटले आणि येथेच आम्ही पिछाडीवर पडलो, असे रूट म्हणाला.

Check Also

आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून एक कोटी 35 लाख रुपयांच्या विकासकामांचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त पनवेल विधानसभा मतदार संघातील ग्रामिण भागात आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली …

Leave a Reply