Breaking News

मुंबईकरांचा आशीर्वाद

भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा मुंबईमध्ये धडाक्यात सुरू झाली. या यात्रेमुळे भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह भरला आहे, तर सत्ताधारी शिवसेनेच्या गोटात धाबे दणाणले आहे. सत्ताधार्‍यांनी त्यांची चलबिचल उघडपणे दिसू न देण्याचा आटोकाट प्रयत्न केला खरा, परंतु राणे यांच्या धडाक्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीच्या वातावरणात आतापासून गडद रंग मिसळला आहे हे निश्चित. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांची जनआशीर्वाद यात्रा गुरुवारी सुरू झाली. राणे यांनी दादर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाला आवर्जून भेट देऊन अभिवादन तर केलेच, पण आपला लढाऊ बाणादेखील स्पष्ट केला. सावरकर स्मारकापासून नजीकच असलेल्या शिवाजी पार्क येथील शिवसेनाप्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिस्थळाला ते भेट देणार की नाही यावर गेले काही दिवस बरीच उलटसुलट चर्चा सुरू होती. स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतिस्थळ ही कोणाची खाजगी मालमत्ता नव्हे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे एकट्या मुंबईकरांचे नव्हे तर अखिल महाराष्ट्राचे लाडके नेते होते. बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करू देणार नाही अशी ताठर भूमिका शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी आधी घेतली होती. त्यामुळे शिवाजी पार्क परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर डोके ठेवण्यासाठी कोणाच्याच परवानगीची गरज नसते अशी कणखर भूमिका भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी घेतली होती. या मुद्द्यावर राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेला सुरुवातीलाच संघर्ष होणार असे बोलले जात होते. स्थानिक शिवसेना नेत्यांनी बाळासाहेबांच्या समाधीवर दर्शन घ्यायला जाल तर शिवसैनिक नुसते बघत बसतील असे तुम्हाला वाटते का, असा सवाल खडा करत संघर्षाचा इशारा दिला होता, परंतु शिवसेना नेत्यांच्या निष्कारण त्राग्याला अजिबात भीक न घालता राणे यांनी बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळावर मस्तक ठेवून आपल्या दिवंगत नेत्याला श्रद्धांजली वाहिली. यानंतर माध्यमांशी संवाद साधताना राणे यांनी जी भावना व्यक्त केली, ती बरेच काही सांगून जाते. ते म्हणाले, साहेब आज हवे होते. ते असते तर त्यांनी मला नक्कीच आशीर्वाद दिला असता. साहेबांचा हात जरी आज माझ्या डोक्यावर नसला, तरी त्यांचे आशीर्वाद नक्कीच माझ्या सोबत आहेत असे मी समजतो. राणे यांची ही भावना भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याची आहे हे सत्ताधारी शिवसेनेला आता स्वीकारावे लागणार आहे. राणे यांनी केंद्रीय मंत्रिपदाची शपथ घेतली तेव्हा बहुतेक सर्वच पक्षाच्या नेत्यांनी राणे यांचे मनमोकळेपणाने अभिनंदन केले होते. अपवाद फक्त शिवसेनेचा. शिवसेनेतर्फे शिष्टाचार म्हणून देखील राणे यांचे अभिनंदन कुणीही केले नाही. हे कशाचे लक्षण आहे? खुद्द राणे यांनी या प्रकाराला कोतेपणाचे लक्षण म्हटले होते. महाराष्ट्रामध्ये वैचारिक मतभेद असले तरी वैयक्तिक स्नेहभाव जपण्याकडे राजकीय नेत्यांचा कल असतो. सत्ताधारी शिवसेनेला मात्र लोकशाहीतील ही उदात्त परंपरा मान्य नसावी. राणे यांच्या जनआशीर्वाद यात्रेमुळे शिवसेनेच्या पायाखालची वाळू आता सरकू लागल्याची चिन्हे दिसू लागली आहेत. मुंबई महापालिकेतील शिवसेनेच्या पापाचा घडा आता भरला असून तो लवकरच फुटेल आणि पालिकेवर यंदा भाजपचा झेंडा फडकेल, अशी भविष्यवाणी राणे यांनी केलीच आहे.

Check Also

कामोठ्यातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी भाजपमध्ये

पनवेल : रामप्रहर वृत्त विधानसभा निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे कामोठे शहर अध्यक्ष किशोर मुंडे, …

Leave a Reply