सभागृह नेते परेश ठाकूर यांचे आवाहन
पनवेल ः प्रतिनिधी
कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आली आहे, मात्र गणेशोत्सवाच्या काळात प्रादुर्भाव वाढण्याचा धोका असल्याने जनतेची काळजी घेणे गरजेचे आहे. आपण आपल्या भावनांना आवर घालून कमीत कमी गर्दी करण्याचा प्रयत्न करा. गणेशोत्सव सुरक्षित आणि काळजी घेऊन साजरा करू या, असे आवाहन पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी केले. पनवेल महापालिकेच्या वतीने आयोजित सार्वजनिक गणेश मंडळांच्या पूर्व नियोजनाच्या बैठकीत ते बोलत होते.
महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी (दि. 27) झालेल्या या बैठकीला स्थायी समिती सभापती संतोष शेट्टी, महिला बालकल्याण सभापती मोनिका महानवर, प्रभाग समिती ‘अ’च्या सभापती अनिता पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत सोनावणे, अतिरिक्त आयुक्त तृप्ती सांडभोर, उपायुक्त विठ्ठल डाके, सहाय्यक आयुक्त धैर्यशील जाधव, महापालिका हद्दीतील पोलीस अधिकारी, वीज मंडळ अधिकारी, महापालिका अधिकारी व सिडको अधिकारी उपस्थित होते. महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी नियमांचे पालन करून सण साजरा करू या, असे या वेळी सांगितले.
परेश ठाकूर यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी गणेश विसर्जन सार्वजनिक ठिकाणी न करता घरच्या घरी किंवा विसर्जनासाठी खास तयार करण्यात आलेल्या कृत्रिम तलावांमध्ये करावे. विसर्जनावेळी कमीत कमी गर्दी करावी, अशा सूचना केल्या.
सहाय्यक पोलीस आयुक्त भागवत यांनी गणेशोत्सवासाठी शासनाने दिलेले नियम सर्वांना सांगितले. उपायुक्त विठ्ठल डाके यांनी सार्वजनिक गणेश मंडळांनी गणेशोत्सवाकरिता महापालिका, पोलीस विभाग, वाहतूक पोलीस यांची परवानगी घेणे आवश्यक असल्याचे सांगितले तसेच गणेशोत्सवासाठी महापालिकेच्या सर्व विभागांनी तयारी सुरू केल्याची माहिती दिली. दहीहंडी व गणेशोत्सव शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करून साजरे करण्याचे आवाहनही त्यांनी केले.
महापालिकेने खास गणेशोत्सवासाठी बनविलेल्या रजिस्ट्रेशन ऑनलाइन अर्जाचे प्रेझेंटेशन या वेळी करण्यात आले. स्मार्ट पीएमसी डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन गणेश मंडळांनी आपले रजिस्ट्रेशन करावे, असे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले.