उरण : विशेष प्रतिनिधी, वार्ताहर
गुजरातमधून टी. एल. लॉजिस्टिकमध्ये बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेला 27 हजार 500 लिटर्स बायोडिझेलने भरलेला टँकर न्हावा-शेवा पोलिसांनी कारवाई करत जप्त केला आहे.आजच्या बाजारभावाप्रमाणे बायोडिझेलची किंमत 28 लाखांच्या घरात आहे. याप्रकरणी पोलिसांनी एका कंपनीच्या मालकासह टँकरचालक, सहकारी अशा तिघांना अटक केली आहे.
वाढत्या इंधन दरवाढीमुळे वाहन मालकांचे कंबरडे मोडले आहे. यामुळे आता परिसरात बेकायदेशीररित्या स्वस्तात मिळणार्या बायोडिझेलचा मोठ्या प्रमाणावर वापर होऊ लागला आहे. शनिवारी असाच गुजरात राज्यातून 27 हजार 500 लिटर्स बायोडिझेलने भरलेला टँकर न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टी. एल. लॉजिस्टिकमध्ये येण्याच्या तयारीत होता, मात्र पोलीस ठाण्याच्या हद्दीतच बायोडिझेल भरलेला टँकर चिखलात अडकून पडला होता. त्यामध्ये बेकायदेशीरपणे विक्रीसाठी आणलेला बायोडिझेलचा साठा असल्याची खात्रीशीर माहिती न्हावा -शेवा बंदर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे मिळाल्यानंतर त्यांनी पथकासह धाड टाकून बायोडिझेल भरलेला टँकर जप्त केला.
पोलिसांनी केलेल्या कसुन चौकशीत 28 लाख किमतीचे बायोडिझेल गुजरातमधून टी. एल. लॉजिस्टिक कंपनीने मागविले असल्याची माहिती उघडकीस आली. पोलिसांनी तत्काळ चौकशीसाठी ताब्यात घेऊन याप्रकरणी टी. एल. लॉजिस्टिक कंपनीचे मालक दिलेश गोगरी आणि टँकर चालक मृत्यूंजय कुमार, जयशंकर पांडे आणि संजय मशरू यांना अटक केली असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांनी दिली.
याप्रकरणी एक केबीन, टँकर, लोखंडी टाक्या, डिझेल भरण्याची मशीन, मोटर असा लाखो रुपये किंमतीचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर विक्रीसाठी आणलेला बायोडिझेलचा साठा जप्त करण्याची उरण परिसरातील ही पहिलीच वेळ असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.