उत्सवावर कोरोनाचे सावट
रोहे : प्रतिनिधी
कोरोनाचे सावट लक्षात घेऊन रोहा शहरासह ग्रामीण भागात गोकुळाष्टमी उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. याही वर्षी शहरात मोठ्या दहीहंड्या लावण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे गोविंदा पथके हिरमुसल्याचे दिसून आले.
कोरोनामुळे रोहे तालुक्यात गेली दोन वर्षे गोकुळाष्टमी व दहीहंडीचा कार्यक्रम साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. या वर्षी सोमवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास पारंपरिक पद्धतीने श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात आला. मंगळवारी रोहा तालुक्यात दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. रोहा शहरातील अंधार आळी, धनगर आळी, मोरे आळी, संत गोरोबा नगर (दमखाडी), ब्राह्मण मंडळी, बंगले आळी व अष्टमी येथे गावपण जपून दहीहंडी उत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. रोहा शहरात याही वर्षी मोठ्या हंड्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे गोविंदा पथके हिरमुसले होते.