सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रयत्नांना यश
पनवेल : रामप्रहर वृत्त
पनवेल महापालिका हद्दीतील ग्रामीण भागात आठवडाभर कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील लसीकरणासंदर्भात पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांनी प्रयत्न केले असून शुक्रवार (दि. 3)पासून आठवडाभर हे लसीकरण होणार आहे.
पनवेल महापालिका हद्दीत सुरू असलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण केंद्रांवर शहरी व ग्रामीण अशा दोन्ही विभागातील नागरिकांची गर्दी होते. ही बाब लक्षात घेता सभागृह नेते परेश ठाकूर यांनी पनवेलच्या ग्रामीण भागातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहीम राबविण्याची मागणी महापालिका प्रशासनाकडे केली. या मागणीची दखल घेत शुक्रवारपासून वारनिहाय कोरोना लसीकरण मोहीम पनवेलच्या ग्रामीण भागात राबविण्यात येणार आहे.
या लसीकरणाचा लाभ ग्रामीण भागातील नागरिकांनीही घ्यावा, यासाठी ही योजना पूर्ण करण्यात आली आहे. दूरच्या भागातील नागरिकांना लसींसाठी शहरापर्यंत मजल मारावी लागू नये, यासाठी आठवडाभरासाठी ही मोहीम राबविली जाणार आहे.