Breaking News

यंदाही सण घरातच!

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या सूचना

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
देशातील अनेक भागांमध्ये पुन्हा एकदा कोरोना संसर्गामध्ये वाढ झाल्याचं आढळून येत आहे. कोरोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत खरंतर आपल्याला सरकारकडून वारंवार सूचना करण्यात येत आहेत. त्यातच सध्या सण-उत्सवांचा हंगाम आहे. अशा काळात निष्काळजीपणामुळे पुन्हा एकदा गंभीर स्थिती उद्भवू नये यासाठी सर्व तज्ञ मंडळी खबरदारी घेण्याचा सल्ला देत आहेत.
दरम्यान, नीती आयोगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल इशारा देताना म्हणाले कि, जर आपण आता थोडीशी जरी चूक केली तरी सध्या नियंत्रणात असलेला संसर्ग पुन्हा भयावह रूप धारण करू शकतो. यामुळे, सगळे कष्ट व्यर्थ जातील. डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, आवश्यक असेल तरच घराबाहेर पडा आणि मास्क वापरा. कोरोना संपला असे समजू नका. मास्क वापरणे सोडून देण्यात वेळ अद्याप आलेली नाही. सध्याच्या संक्रमणाच्या काळात तुम्ही सर्वांनी गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही सर्व सण साधेपणाने घरातच साजरे केलेत तर खूप योग्य होईल. संसर्गाची गती मंदावली आहे, परंतु आपली जराशा निष्काळजीपणामुळे ती पुन्हा वाढू शकते. याचसोबत कोरोना व्हायरसच्या म्यूटेशनबाबत इशारा देताना डॉ. पॉल म्हणाले की, जेव्हा जेव्हा विषाणू बदलतो म्हणजे म्यूटेट होतो तेव्हा तो संपूर्ण यंत्रणा हादरवून टाकतो.
डॉ. व्ही. के. पॉल यांनी या वेळी लसीकरणासाठी महिलांना पुढे येण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, महिलांच्या लसीकरणाचा आकडा आमच्या अपेक्षेपेक्षा फार कमी आहे. गर्भवती महिलांसाठी कोरोना लस अत्यंत महत्वाची आहे. या वेळी ते असेही म्हणाले कि, ज्यांनी ज्यांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. त्यांनी दुसरा डोस देखील वेळेत घ्यावा.
नीती आयोगाने करोनाच्या संभाव्य तिसर्‍या लाटेबाबत याआधीच इशारा दिला आहे. नीती आयोगाच्या मते, सप्टेंबर आणि ऑक्टोबर महिन्यात करोनाची तिसरी लाट येऊ शकते. त्यामुळे, आयोगाकडून सर्वसामान्यांना वारंवार सावध राहण्याचे आणि स्वतःची योग्य काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply