धोक्याचा इशारा

जागतिक हवामान बदलास रोखण्याचे प्रयत्न आंतरराष्ट्रीय स्तरावर कागदोपत्री कधीचेच सुरू झाले आहेत. त्यादृष्टीने केलेल्या पॅरिस करारावर तब्बल 197 देशांच्या स्वाक्षर्‍या आहेत. परंतु प्रत्यक्षात कुणीच फारसे काही केलेले नाही. पृथ्वीच्या दोन्ही धु्रवांवरील बर्फ वितळू लागले आहे. परिणामी समुद्रातील पाण्याची पातळी वाढते आहे. कित्येक देशांच्या किनारपट्ट्यांवरील भूभागांना त्यामुळे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. यापूर्वी यासंदर्भात देण्यात आलेले इशारे फारशा गांभीर्याने घेतले गेले नव्हते. परंतु आता किमान त्याची दखल घेतली जाताना दिसू लागली आहे.

सध्या अमेरिकेत न्यूयॉर्क आणि नूजर्सी या दोन शहरांमध्ये आइडा चक्रीवादळ व विक्रमी पावसामुळे आणीबाणीची परिस्थिती ओढवली आहे. प्रचंड वादळी वारे, धुंवाधार पाऊस यामुळे तिथे कित्येक घरांचे नुकसान झाले असून पूरस्थितीमुळे आणीबाणी जाहीर करणे भाग पडले आहे. रस्ते, विमान वाहतूक ठप्प झाली असून जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. कोकण किनारपट्टीची गेल्या दीड वर्षात दोन चक्रीवादळांमुळे अशीच किंबहुना याहून कितीतरी अधिक वाताहत झाली. दोन्ही ठिकाणच्या परिस्थितीचा संबंध काय असे कुणाला वाटत असेल तर वास्तवात फारच मोठा आणि गंभीर असा संबंध आहे. संयुक्त राष्ट्रांच्या इंटर गव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंजने अलीकडेच हवामान बदलविषयक आपला अहवाल सादर केला. हवामान बदलाने धोक्याची पातळी गाठली असून सर्व देशांनी त्यातील आपल्या सहभागाची जबाबदारी स्वीकारून उचित बदलांना वेगाने सुरूवात न केल्यास अवघ्या जगाला येत्या वीस-तीस वर्षांत आत्यंतिक भीषण परिणामांना तोंड द्यावे लागेल असा गंभीर इशारा कोड रेड असे संबोधलेल्या या अहवालात देण्यात आला आहे. पृथ्वी भोवतीचे तापमान वाढत असून त्याचा परिणाम म्हणूनच सगळीकडे महापूर, वादळे, हिमस्खलन, दुष्काळ, वणवे, उष्णतेच्या तीव्र लाटा, बर्फाची वादळे यांचे प्रमाण वाढताना दिसते आहे. मानवाने अजाणतेपणी काही चुका केल्या तर काही बेपर्वाईने. या सार्‍याच चुका न सुधारल्यास येत्या काही वर्षांत 1.5 किंवा 2 डिग्री सेल्सिअसने पृथ्वीचे तापमान वाढेल आणि मग वर उल्लेखलेल्या नैसर्गिक आपत्तींचे प्रमाण अधिकच वाढलेले दिसून येईल. निसर्ग कुणाशीच भेदभाव करीत नाही. त्यामुळे गरीब-श्रीमंत, सामर्थ्यशाली वा दुबळे कुणीही त्याच्या तडाख्यापासून स्वत:चा बचाव करू शकणार नाहीत. आपण वेळीच पावले उचलली नाहीत तर दक्षिण मुंबईचा बराचसा परिसर 2050 पर्यंत पाण्याखाली जाईल असा इशारा मुंबई महापालिकेच्या आयुक्तांनी अलीकडेच दिला. मुंबई हवामान बदल नियोजनासंबंधीच्या एका वेबसाइटचे उद्घाटनही त्यावेळी पार पडले. आता संबंधितांचे हे प्रयत्न प्रामाणिक आहेत की निव्वळ महापालिका निवडणुकांवर डोळा ठेवून ही चर्चा केली जात आहे हे येणार्‍या काळात उघड होईलच. भारतातील तब्बल 12 शहरे पाण्याखाली जाण्याचा इशारा नासाने यापूर्वीच दिला आहे. काही दिवसांचा पाऊस अवघ्या काही तासांत पडणे, अरबी समुद्रातील चक्रीवादळांचे प्रमाण वाढणे यांसारखे बदल तर स्पष्ट दिसतच आहेत. कुठेतरी काहीतरी बिनसत चालले आहे याची जाणीव अगदी सर्वसामान्य माणसालाही झाली आहे. परंतु हे सारे रोखण्यासाठी आपल्यापैकी प्रत्येकाचा हातभार लागणे आवश्यक आहे याची जाणीव मात्र विरळाच आहे. ती व्यापक झाली तरच मानवतेची विनाशाकडे चाललेली वाटचाल रोखता येईल.

Check Also

Perish Arten bei Freispielen existieren in Moglich Casinos?

Neue Casinos via Freespins abzuglich Einzahlung Der ihr Hauptvorteile beim Zum besten geben in virtuellen …

Leave a Reply