खोपोली : प्रतिनिधी
लोणावळ्याहून खोपोली शहरात बोरघाटातून उतरत असलेली एक कार गुरुवारी (दि. 2) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास खोल दरीत कोसळली. या कारमधील जखमी तरुणाचे प्राण अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी या संस्थेच्या पथकाने वाचविले.
सागर वावळे हा तरुण नाईट फुटबॉल खेळण्यासाठी गुरुवारी रात्री आपल्या मारुती झेन कारने लोणावळा येथून खोपोलीकडे येत होता. बोरघाटातील शिंग्रोबा देवस्थानाच्या वरच्या बाजूला असलेल्या खिंडीत त्याच्या गाडीला अचानक जोरदार धक्का बसला आणि त्याची कार धक्के खात खोल दरीत कोसळली. दरम्यान, गाडीचा दरवाजा उघडून सागर खाली कोसळला, त्याचा मोबाईल दूरवर जाऊन पडला. या परिस्थितीत सागरने मोबाईल शोधून काढला आणि मित्र व घरच्यांशी संपर्क साधून घडलेला प्रकार सांगितला. लोणावळ्याच्या शिवदुर्ग मित्र मंडळाचे सुनील गायकवाड यांनी खोपोलीच्या अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेला अपघाताची माहिती दिली. या संस्थेचे मुख्य समन्वयक गुरुनाथ साठेलकर व त्यांचे सहकारी तातडीने घटनास्थळी पोहचले. ते रात्रीचा अंधार, पाऊस, खोल दरी याची तमा न बाळगता खाली उतरले. त्या जखमी तरुणास सुखरूप बाहेर काढून रुग्णालयात दाखल केले.