जेलमधील मुक्काम वाढला; पुढील सुनावणी 9 सप्टेंबरला
पनवेल ः प्रतिनिधी
कर्नाळा बँकेच्या कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी बँकेचे अध्यक्ष आणि शेतकरी कामगार पक्षाचे नेते, माजी आमदार विवेकानंद शंकर पाटील यांचा तळोजा जेलमधील मुक्काम सत्र न्यायालयाने 9 सप्टेंबरपर्यंत वाढवला आहे, तसेच त्यांना तळोजा जेलमधून रिलायन्स फाऊंडेशनच्या हॉस्पिटलमध्ये सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) बंदोबस्तात तपासणीसाठी नेण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे, मात्र विवेक पाटील यांना रुग्णालय भेटीच्या काळातही शेकापच्या नेत्यांना भेटताही येणार नाही.
सध्या विवेक पाटील यांचा मुक्काम तळोजा कारागृहात आहे. ‘माझी लिव्हर ट्रान्सप्लांट सर्जरी झाली असून मला रूटीन चेकअपसाठी सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये जाण्याची परवानगी मिळावी,’ असा अर्ज त्यांनी न्यायालयाकडे केला होता. शासकीय रुग्णालयात या अशा तपासणीची सोय नसल्याची खात्री पटल्यावर त्यांना सर एच. एन. रिलायन्स फाऊंडेशन हॉस्पिटलमध्ये स्वतःच्या खर्चाने जाण्याची परवानगी न्यायालयाने दिली आहे.
या संदर्भात न्यायालयाने विवेक पाटील यांना विविध अटी घातल्या आहेत. या टेस्टची खरोखर गरज आहे का याची खात्री ईडीने करावी आणि त्याबाबतचा रिपोर्ट न्यायालयाला द्यावा, तसेच रुग्णालयातील तपासणी झाल्यावर विवेक पाटील यांना ताबडतोब पुन्हा तुरुंगात हजर करावयाचे आहे. त्यासाठी त्यांना ‘ईडी’च्याच बंदोबस्तात हॉस्पिटलमध्ये न्यावे आणि परत तुरूंगात आणावे लागणार आहे.
आरोपीच्या म्हणजे विवेक पाटील यांच्या वकिलांना या तपासणीदरम्यान हजर राहावयाचे असल्यास त्यांनी ठराविक दिवस आधी ईडीला कळविणे आवश्यक आहे. अशा विविध अटी न्यायालयाने घातल्या आहेत. त्यामुळे विवेक पाटील जेलमधून रुग्णालयात जाण्यासाठी बाहेर आले तरी शेकाप नेत्यांना किंवा इतर कोणाला त्यांना भेटता येणार नाही हे यावरून स्पष्ट होत आहे.
विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत शुक्रवारी (दि. 3) संपत होती. त्यांना तळोजा जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ईडी न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. ‘ईडी’चे असिस्टंट डायरेक्टर सुनीलकुमार यांनी विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मागणी मान्य केली. आता पुढील सुनावणी 9 सप्टेंबरला होईल.