16 नायजेरियन नागरिक ताब्यात
पनवेल : वार्ताहर
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला क्राईम ब्रँचकडून खारघर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली आहे. खारघरमधील एका बंगल्यातून 16 नायजेरियांना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्याकडून एक कोटी रुपयांचे ड्रग्स हस्तगत करण्यात आले आहे.
खारघर सेक्टर 12मधील एका बंगल्यात गांजा पार्टी सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी या बंगल्यात धाड टाकत सहा महिला आणि 10 पुरुष असे एकूण 16 नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी एक कोटींचे ड्रग्ज हस्तगत केले आहे. या प्रकरणी अधिक तपास सुरू आहे.
गेल्या काही महिन्यांपासून खारघर शहरात नायजेरियन, युगांडा, नांबिया देशातील नागरिक मोठ्या संख्येने अनधिकृतपणे राहत आहेत. याकडे भाजपच्या वतीने लक्ष वेधत सरचिटणीस दीपक शिंदे यांनी शिष्टमंडळासह स्थानिक पोलीस ठाण्याला 26 मे 2022 रोजी निवेदन दिले होते. अशा अनधिकृत राहणार्या नागरिकांची नोंद पोलीस ठाण्यात आहे का? शिवाय अमली पदार्थ विक्रीमध्ये नायजेरियन व्यक्तींचा सहभाग असल्याचे यापूर्वी आढळून आले असल्याने स्थानिक तरुण जीवघेण्या नशेच्या आहारी जाणार नाहीत ना? याची काळजी घ्यायला हवी, अशीही चिंता त्यांनी व्यक्त केली होती.