कळंबोली : बातमीदार
सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या कळंबोली येथील मराठी प्राथमिक विद्यालयात शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा खाजगी प्राथमिक शिक्षक संघटनेतर्फे शिक्षकांचा गुणगौरव करून संघटनेला संविधानाची प्रत भेट म्हणून देण्यात आली. तर वृक्षलागवड, गुणवंत शिक्षकांचा गुणगौरव करण्यात आला. या वेळी मोठ्या संख्येने शिक्षक वर्ग उपस्थित होता.
या कार्यक्रमास रायगड जिल्हा प्राथमिक शिक्षक संघटनेचे उपाध्यक्ष सुधाकर जैवल, चिटणीस यशवंत मोकल, पनवेल तालुका संघटक ज्ञानेश्वर ठाकूर, विद्यालयाच्या मुख्याध्यापिका हेमलता पाटील, हिंदी प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका जयवंती सावंत, तसेच विविध शाळांतील मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.
या कार्यक्रमात खारघरमधील सिद्धार्थ मल्टीपर्पज स्कूलने संघटनेला भारतीय राज्यघटनेची एक प्रत भेट म्हणून दिली. शिक्षक दिनाबरोबरच मातृदिनही साजरा करून पुष्पगुच्छ देऊन सर्वांचे अभिनंदन करण्यात आले. शिक्षक दिनाचे औचित्य साधून उपस्थित मान्यवरांना वृक्ष भेट देण्यात आले, तसेच कार्यक्रमाची स्मृती कायमस्वरूपी जतन राहावी म्हणून विद्यालयाच्या प्रांगणात एका वृक्षाची लागवड करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना मराठी प्राथमिक विद्यालयातील माधवी वरूनकर यांनी केली.