रोहा, धाटाव ः प्रतिनिधी
दोन-तीन दिवसांच्या नवजात मुलाला निर्जनस्थळी झुडपात फेकून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (दि. 7) सायंकाळी रोह्यात कब्रस्तान परिसरात समोर आली.
कब्रस्तानमागे कावळ्यांची गर्दी का झालीय हे पाहण्यासाठी ताबिश लद्द हा युवक गेला असता त्याला अर्भक दिसून आले. त्याने लगेच झुडपे बाजूला करून प्रथम बालकाला सुरक्षित केले. या बाळाला डोक्यावर कावळ्याने टोच मारून जखमी केले होते तसेच त्याच्या अंगावर माशा, मुंग्या, कीडे, दिसून आले.
यानंतर काही ग्रामस्थ मदतीला आले. लागलीच पोलिसांना कळविण्यात आले. त्यानुसार निरीक्षक संजय पाटील व सहकारी घटनास्थळी हजर झाले. या घटनेचा अधिक तपास सुरू आहे.
नवजात बालकाला अलिबाग जिल्हा रुग्णालयात देखरेखीसाठी ठेवण्यात आले आहे. कोणीतरी अज्ञात व्यक्तीने नवजात बालकाच्या जन्मानंतर त्याचा परित्याग करण्याच्या उद्देशाने त्याला बेवारस स्थितीत सोडून दिले असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असुन याबाबत रोहा पोलीस ठाण्यात भा. दं. वि. क.317 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नाईक पाटील हे करीत आहे.