रायगडात गणेशोत्सवाला साधेपणात सुरूवात
अलिबाग : प्रतिनिधी
अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणपती बाप्पांचे शुक्रवारी घरोघरी आगमन झाले. आपल्या लाडक्या बाप्पांची भक्तांनी मनोभावे सेवा केली. दरम्यान, दीड दिवसांच्या गणपतींचे शनिवारी (दि. 11) अत्यंत साध्या परंतु भावपूर्ण वातावरणात विसर्जन झाले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर व पर्यावरणपूरक सण साजरे करण्याच्या उद्देशाने कृत्रिम तलावांमध्ये बाप्पांचे विसर्जन करण्याकडे भाविकांचा कल दिसून आला.
घरोघरी गणेशमूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेशांची पूजाअर्चा करण्यात आली. दुपारी टाळमृदुंगाच्या नादात आरती झाली. मोदकांचा नैवेद्य दाखवण्यात आला. जगावरील कोरोनाचे संकट दूर कर, असे साकडे सर्वांनीच आपल्या लाडक्या गणरायाला घातले.
गणेशोत्सवानिमित्त चाकरमानी मोठ्या संख्येने गावागावात दाखल झाले आहेत. गेल्यावर्षी कोरोनामुळे अनेकांना गावी येणे शक्य झाले नव्हते. यंदा गावी येणार्या भक्तांची संख्या मोठी आहे, मात्र यंदाही कोरोनाचा प्रभाव गतवर्षीच्या तुलनेत कमी असला तरी उत्साह कमीच आहे. त्यातच अधूनमधून पडणारा पाऊस निरूत्साहात भर घालत होता. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशोत्सवातदेखील शांततेचे वातावरण आहे.