रोहे : प्रतिनिधी
27 सप्टेंबर या जागतिक पर्यटन दिनाचे औचित्य साधून रायगड जिल्ह्यातील अस्सल कोकण परिचित होण्यासाठी एक विशेष छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे. दक्षिण रायगड जिल्ह्यातील परिचित, अपरिचित आणि अप्रकाशित पर्यटनस्थळांचा शोध व्हावा आणि जास्तीत जास्त पर्यटकांपर्यंत ती स्थळे पोहोचवावी या उद्देशाने रायगड जिल्हा कृषी प्रबोधिनी व लक्ष्मीसृष्टी अॅग्रो पर्यटन सहकारी सेवा या संस्थेतर्फे निसर्ग छायाचित्र स्पर्धा आयोजित केली आहे.
या स्पर्धेत निसर्ग पर्यटन, धार्मिक पर्यटन, वर्षा पर्यटन, कासपठार, निसर्गरम्य दृश्य, नद्या, तलाव, प्राणीजीवन, गिर्यारोहण, ट्रेकिंग त्याचबरोबर ऐतिहासिक स्थळे, लेणी, गड-किल्ले आणि स्थळांची छायाचित्रे सादर करता येतील. जागतिक पर्यटन दिनानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे. 12 बाय 18 इंच 300 डी.पी.आय सोल्युशन असलेले छायाचित्र ई-मेल व व्हॉटस्अॅप क्रमांकावर दिनांक 25 सप्टेंबर 2021 पर्यंत द्यावयाची आहेत.
छायाचित्रासोबत स्थळाची थोडक्यात माहिती, तसेच स्पर्धकांनी स्वतःचे नाव, पूर्ण पत्ता, ई-मेल अॅड्रेस आणि संपर्क क्रमांक द्यावयाचा आहे. या स्पर्धेत रायगड जिल्ह्यातील रहिवासी असलेले स्पर्धक स्पर्धेत भाग घेऊ शकतात. यात व्यावसायिक फोटोग्राफरही भाग घेऊ शकतात व छायाचित्र मोबाईल आणि कॅमेरा या दोन माध्यमातून टिपलेली असावीत. छायाचित्रामध्ये कोणतीही छेडछाड करू नये. स्पर्धेसाठी प्रवेश शुल्क 100 रुपये एवढे आहे. पहिल्या तीन क्रमांकांना अनुक्रमे तीन हजार रुपये, दोन हजार रुपये, एक हजार रुपये आणि उत्तेजनार्थ पहिल्या दोन क्रमांकांना एक-एक हजार रुपये अशी रोख पारितोषिके देण्यात येणार आहेत.
स्पर्धकांनी आपली छायाचित्रे प्रवेश शुल्कासह (गुगल-पे नं. 8879434166, 9270035357) रायगड चणेरा येथील प्रसिद्ध छायाचित्रकार श्याम सरलेकर 92269 29243, गणेश भगत 8879434166, अतुल पाटील 9270035357 या व्हॉटस्अॅप क्रमांकावर पाठवावीत. या स्पर्धेत जास्तीत जास्त स्पर्धकांनी भाग घ्यावा असे आवाहन संस्थेचे संचालक गणेश बा. भगत आणि अतुल पाटील यांनी केले आहे.