Monday , January 30 2023
Breaking News

आता तरी जागे व्हा!

संभाजीराजेंचा राज्य सरकारला इशारा

जालना : प्रतिनिधी

जालना जिल्ह्यातील एका तरुणाने मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मराठा समाजाला आरक्षण नाही, रोजगार व व्यवसायाच्या संधी उपलब्ध नाहीत या नैराश्यातून सदाशिव शिवाजी भुंबर या तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना जालन्यातील परतूर तालुक्यातील येणोरा गावात घडली आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारला इशारा दिला आहे.

अनेकवेळा पाठपुरावा, आंदोलने केली, मात्र शासनाकडून कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. माझी सूचना आहे की, सरकारने आता तरी जागे व्हावे आणि या विषयात जातीने लक्ष घालावे, असे म्हणत संभाजीराजेंनी आपला संताप व्यक्त केला आहे. त्यांनी आपल्या फेसबुक पोस्टच्या माध्यमातून सरकारवर हा निशाणा साधला आहे.

आरक्षण नाही, रोजगाराच्या संधी नाहीत, व्यवसायासाठी पाठबळ नाही यामुळे अनेक मराठा तरुण नैराश्यात जात आहेत. आत्महत्येसारखे पाऊल उचलत आहेत. देशाचे भविष्य असणारी तरुण पिढी अशा परिस्थितीत जाणे हे हितकारक नाही, अशी चिंतादेखील या वेळी त्यांनी व्यक्त केली.

तरुणांना सक्षम करण्यासाठी आम्ही समाजाच्या वतीने शासनाकडे आरक्षणासह सारथी संस्था, आण्णासाहेब पाटील महामंडळ यांच्या माध्यमातून उच्च शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार व व्यवसाय उपलब्धता यांसारख्या इतर अनेक मागण्या केल्या, मात्र शासनाकडून त्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केली जात नाही. वेळोवेळी आमच्या पदरी निराशाच पडत आहे, असे म्हणत संभाजीराजे छत्रपती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

संभाजीराजे यांनी या वेळी सदाशिव भुंबर या तरुणाला श्रद्धांजली अर्पण करीत मराठा तरुणांना असे कोणतेही टोकाचे पाऊल न उचलण्याची विनंती केली आहे. ते म्हणाले, मी कळकळीची विनंती करतो की, मी तुमच्यासाठी सदैव लढायला तयार आहे. तुमचे धैर्य हीच समाजाची ताकद आहे. त्यामुळे कुणीही हिंमत हारू नका. असा मार्ग निवडू नका. आपले न्याय्य हक्क मिळविण्यासाठी व भावी पिढीचे भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण एकजुटीने व धैर्याने लढा देऊ.

Check Also

माथेरानकर अनुभवणार सुलभ, स्वस्त प्रवास

ई-रिक्षाच्या सुविधेमुळे पर्यटकांसह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण माथेरान : रामप्रहर वृत्त दहा वर्षांपूर्वी नगरपरिषदेच्या तत्कालीन लोकप्रतिनिधीनी …

Leave a Reply