Breaking News

अनंत गीतेंच्या वक्तव्याचे पडसाद

मुंबई ः प्रतिनिधी
माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी महाविकास आघाडी सरकारवरून केलेल्या वक्तव्याचे राज्याच्या राजकारणात जोरदार पडसाद उमटले आहेत. विविध पक्षांच्या नेत्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत, तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन गीतेंवर टीका केली आहे. यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस खासकरून अनंत गीते विरुद्ध सुनील तटकरे असा जुना राजकीय वाद पुन्हा एकदा डोके वर काढू लागल्याचे दिसत आहे.
लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर काही काळ शांत झालेले अनंत गीते पुन्हा रायगडच्या राजकारणात सक्रिय झाले आहेत. श्रीवर्धन येथे त्यांच्या उपस्थितीत सोमवारी (दि. 20) झालेल्या मेळाव्यात माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश कोळंबकर यांच्यासह अनेकांनी शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी, महेंद्र थोरवे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी गीते यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर सडकून टीका केली.
महाविकास आघाडी ही सत्तेची तडतोड आहे. काँग्रेससुद्धा काँग्रेस आहे, राष्ट्रवादीसुद्धा काँग्रेस आहे. तरी एकमेकांचे तोंड बघत होते का, एकमेकांचे कधी जमत होते का, यांचा विचार एक आहे का? दोन काँग्रेस एक विचारांची होऊ शकत नाही, तर शिवसेना ही काँग्रेस विचारांची कदापी होऊ शकणार नाही, असे गीते म्हणाले होते.
एवढेच नव्हे तर राष्ट्रवादीचा जन्म काँग्रेसच्या पाठीत खंजीर खुपसून झाला आहे. दुसरा कुठलाही नेता, त्याला जगाने कितीही उपाध्या देवोत, त्याला कोणी जाणता राजा म्हणो, पण आमचा गुरू तो होऊ शकत नाही, आमचे गुरू फक्त बाळासाहेर ठाकरे, अशा शब्दांत गीतेंनी राष्ट्रवादीला लक्ष्य केले. त्यांच्या या विधानांचे जोरदार पडसाद उमटले आहेत.

वैफल्यग्रस्त भावनेतून गीतेंचे वक्तव्य -सुनील तटकरे
अलीकडच्या काळात गीते यांची राजकीय अवस्था सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी झाली आहे. त्यामुळे अशा भावनेतून त्यांचे हे वैफल्यग्रस्त उद्गार आले आहेत, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे नेते खासदार सुनील तटकरे यांनी मंगळवारी (दि. 21) पत्रकार परिषदेत दिले.
गीते बोलल्याने काही फरक पडत नाही. सूर्यावर थुंकण्याचा हा प्रकार आहे. शरद पवार हे देशाचे नेते आहेत, आघाडीचे जनक आहेत. अडगळीत पडलेल्या लोकांना त्या गोष्टीचे भान राहिले नसेल. म्हणून त्या नैराश्यापोटी आलेली ती वक्तव्ये असू शकतील, असेही तटकरे या वेळी म्हणाले.

गीतेंचे वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित -फडणवीस
माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते अनंत गीते यांनी केलेले वक्तव्य सत्य परिस्थितीवर आधारित आहे. अशी अनैसर्गिक आघाडी कधी चालू शकत नाही. मी तर पहिल्यापासून सांगतोय, ही अनैसर्गिक युती आहे. यांचे सरकार नीटपणे चालू शकत नाही, असे विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. गीतेंच्या विधानावर भाजप नेते व माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही प्रतिक्रिया दिली. ’संजय राऊत हे शिवसेनेचे की, राष्ट्रवादीचे यावर पीएचडी करावी लागेल. राऊत हे उद्धव ठाकरेंचे जेवढे कौतुक करत नाहीत त्यापेक्षा ते जास्त शरद पवारांचे कौतुक करतात, पण मी हमखास सांगतो, शिवसेनेच्या कोणत्याही मंत्र्यांची, कोणत्याही नेत्याची, कार्यकर्त्याची नार्को टेस्ट करा, त्यातून एकच आवाज बाहेर येईल काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत शिवसेनेने जाणे म्हणजे हे पोलिटिकल सुसाईड आहे’, असे मुनगंटीवार म्हणाले.

गीते बरोबर बोलले -नाना पटोले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अनंत गीते यांचे महाविकास आघाडीबाबतचे वक्तव्य योग्यच असल्याचे म्हटले आहे. पटोले म्हणाले, महाविकास आघाडी ही त्यावेळची राजकीय परिस्थितीनुसार तयार झाली. त्यामुळे गीतेंच्या या वक्तव्याचे आम्ही समर्थन करतो. हे बरोबरच आहे. गीते काही चुकीचे बोलले नाहीत.

महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यापासून राष्ट्रवादी काँग्रेस ज्या पद्धतीने शिवसेनेला दाबून किंबहूना दबाव टाकून पक्षाचा विस्तार करतेय आणि शिवसेनेला नुकसान पोहचतंय. या सगळ्या गोष्टींची घुसमट, त्या वेदना, संवेदना, भावना अनंत गीते यांच्या वक्तव्यामधून बाहेर आल्यात.
-प्रवीण दरेकर, विरोधी पक्षनेते, विधान परिषद

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply