कांदळवनास धोका; तांडेल फांउडेशनची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार
रेवदंडा : प्रतिनिधी
तेलतवंग पसरल्याने रेवदंडा समुद्रकिनारा विद्रुप होत असून, पर्यटकही नाराज झाले आहेत. समुद्रातून वाहून आलेला तेलतवंग किनार्यावरील कांदळवनास हानिकारक असून, कांदळवन नष्ट होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. त्याबाबत पै. अब्बासभाई तांडेल फाउंडेशनच्या अध्यक्षा नईमा सलीम तांडेल यांनी महाराष्ट्र प्रदुषण नियत्रंण मंडळास निवेदन पाठविले आहे.
मोठी जहाजे खराब ऑईल समुद्रात टाकत असतात. समुद्रातून वाहून आलेल्या तेलतवंगाने रेवदंडा समुद्रकिनारा विद्रुप झाला असून त्यामुळे येथे येणारे पर्यटक नापसंती व्यक्त करत आहेत. परिणामी सध्या येथे पर्यटकांची संख्या फार कमी झाली असून, त्यामुळे समुद्रकिनार्यावर व्यवसाय करणार्या स्थानिकांना फटका बसत आहे. तेलतवंग कांदळवनास हानिकारक असून येथील कांदळवन नष्ट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या तेलतवंगाबाबत तातडीने योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी तांडेल फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा नईमा तांडेल यांनी निवेदनात केली आहे.