माणगाव सत्र न्यायालयाचा निकाल
पोलादपूर : प्रतिनिधी
धनगर कुटूंबातील अल्पवयीन विवाहितेवर तिच्याच चुलत सासर्याने तिचे अपहरण करून वरंध घाटातील एका टपरीमध्ये तसेच एका मंदिराच्या पडवीमध्ये तीनवेळा बलात्कार केल्याचा गुन्हा 13 जानेवारी 2018 रोजी घडला होता. याप्रकरणी माणगाव सत्र न्यायालयाने मंगळवारी (दि. 21) आरोपी चुलत सासर्याला 10 वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख 50हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
पुरंदर (जि. पुणे) येथील एक धनगर कुटूंब मेंढरं घेऊन दरवर्षीप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील धारवली गावामध्ये आले होते. त्यातील एका अल्पवयीन विवाहितेला तिच्या चुलत सासर्याने 13 जानेवारी 2018 रोजी महाड तालुक्यातील वरंध घाटातील टपरीमध्ये नेऊन बळजबरीने शरीरसंबंध ठेवले आणि नंतरही वाघजाई मंदिराच्या पडवीमध्ये दोनवेळा जबरदस्तीने चुलत सासर्याने शरीरसंबंध ठेवले.
या प्रकरणी पोलादपूर पोलिसांनी पीडितेचा चुलत सासरा असलेल्या आरोपीविरूध्द गुन्हा दाखल केला. सहाय्यक निरीक्षक प्रकाश पवार यांनी तपास करून आरोपीविरूध्द माणगाव येथील विशेष न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले.
विशेष व सत्र न्यायाधीश पी. पी. बनकर यांनी मंगळवारी आरोपीला 10 वर्षे सक्तमजुरी आणि एक लाख 50हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.