Breaking News

राष्ट्रवादीसोबत आघाडी नकोच!

रायगडातील शिवसेना पदाधिकार्‍यांची उद्योगमंत्री सुभाष देसाईंसमोर स्पष्ट भूमिका

माणगाव ः प्रतिनिधी
आम्हाला कुठल्याही पक्षासोबत आघाडी करायला सांगा, पण राष्ट्रवादी काँग्रेससोबत यापुढे जमणार नाही, अशी स्पष्ट भूमिका रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे आमदार आणि प्रमुख पदाधिकार्‍यांनी आपल्या पक्षाचे ज्येष्ठ नेते व राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्यासमोर बुधवारी (दि. 22) मांडली. जिल्हा परिषदेसह आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावरच लढवू, असेही स्थानिक नेतेगणांनी या वेळी सांगितले.
माजी केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते खासदार अनंत गीते यांनी श्रीवर्धन येथे राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे राजकीय वर्तुळात जोरदार पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी बुधवारी माणगाव येथे तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीस शिवसेनेचे आजी-माजी आमदार तसेच पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत देसाई यांनी आगामी स्थानिक निवडणुकांबाबत पदाधिकार्‍यांची मते जाणून घेतली. राज्यात महाविकास आघाडी सत्तेवर आहे, मात्र जिल्ह्यात राष्ट्रवादीसोबत जाण्यास स्थानिक पदाधिकार्‍यांनी या वेळी विरोध दर्शवला. वेळ पडलीच आणि युती आघाडी करायची झाल्यास अन्य कुठल्याही पक्षासोबत करायला सांगा, पण राष्ट्रवादीशी नकोच, अशी थेट भूमिका त्यांनी मांडली.
रायगडात शिवसेनेचे तीन आमदार असतानाही पालकमंत्रिपद मात्र एक आमदार असलेल्या राष्ट्रवादीला मिळाले. याचे शल्य आमदारांसह शिवसैनिकांनाही आहे. त्यातच पालकमंत्री आणि खासदार कुरघोडीचे राजकारण करतात, आमदारांना विश्वासात घेत नाही, अशा तक्रारी शिवसेनेकडून सातत्याने केल्या जात आहेत. गीते यांच्या रूपाने या सार्‍याला वाचा फुटली असल्याची भावना शिवसैनिकांमध्ये आहे. त्यातूनच राष्ट्रवादीशी आता सोबत नको, अशी भूमिका शिवसेनावाल्यांनी घेतली आहे.

Check Also

कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपच्या निरंजन डावखरे यांचा अर्ज दाखल

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी भाजपच्या वतीने विद्यमान आमदार …

Leave a Reply