कर्जत : बातमीदार
मुरबाड-कर्जत-खोपोली महामार्गावर म्हसा येथे बांधलेल्या नवीन पूलाला काही महिन्यातच भेगा पडल्या आहेत. या पुलाला काही धोका निर्माण झाल्यास हा महामार्ग बंद होऊ शकतो. दरम्यान, पुलाचे काम चांगले झाले असून नवीन पुलाला कोणताही धोका नाही, असा दावा रस्ते विकास महामंडळकडून करण्यात येत आहे. समृद्धी महामार्गवरील वाहने कसारा-डोळखांब येथून मुरबाड-कर्जत अशी येणार आहेत. त्यामुळे रस्ते विकास महामंडळाने या रस्त्यावरील म्हसा (ता. कर्जत) येथील लहान पुलाच्या जागेवर नवीन पूल बांधला आहे. त्याचे काम सुरू असताना पुलाच्या सर्व भागात भेगा पाडण्यास सुरुवात झाली होती. आरसीसी बांधकाम होताना पाण्याचा वापर केला गेला जात नव्हता. त्याबाबत काही वाहन चालकांनी पुलाचे काम करणार्या अधिकार्यांकडे तक्रारी केल्या. त्यावेळी महामंडळाने पांढरा सिमेंट रंग लावून पुलाच्या भिंतींना पडलेल्या भेगा बुजविण्याचा प्रयत्न केला होता. मे 2021 मध्ये या नवीन पुलाचे काम पूर्ण करण्यात आले. आता या पुलाच्या आरसीसी बांधकामाला भेगा पडण्यास सुरुवात झाली आहे. या पुलाला काही धोका निर्माण झाल्यास येथे पर्यायी रस्ता तेथे उपलब्ध नाही, त्याची भीती वाहनचालक व्यक्त करीत आहेत.
मुरबाड-कर्जत-खोपोली या रस्त्यावर बनवले जाणारे नवीन पूल ही आमच्यासारख्या सातत्याने प्रवास करणार्या वाहनचालकांसाठी धोक्याची घंटा आहे. पुलाला पडलेल्या भेगांचे शासनाने स्ट्रक्चरल ऑडिट करावे.
-दिनेश भोईर, ग्रामस्थ, पोही
म्हसा येथील नवीन पुलाचे काम चांगल्या दर्जाचे झाले आहे. पुलाचे आरसीसी बांधकाम करताना नवीन रेडिमिक्स सिमेंट वापरण्यात आले आहे. त्यात असलेल्या केमिकलमुळे बांधकाम केल्यावर पाण्याची आवश्यकता राहत नाही. तरीदेखील तक्रारी असतील, तर पुलाची पाहणी केली जाईल.
-सीमा पाटील, उपअभियंता, राज्य रस्ते विकास महामंडळ