तब्बल 29-30 समाजकंटकांनी सुमारे आठ महिने एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार करावेत ही अंगावर शहारे आणणारी गोष्ट आहे. कुठलाही सुजाण नागरिक यामुळे शरमेने मान खाली घातल्याशिवाय राहणार नाही. डोंबिवलीतील या बलात्कार प्रकरणाचे पडसाद आता देशभर उमटतील किंबहुना प्रसारमाध्यमे हे काम आवर्जून करतील. यामुळे महाराष्ट्राची उरलीसुरली अब्रूदेखील नष्ट होणार आहे. देशभरातील महिलांवरील अत्याचारांचे गुन्हे आणि त्यांची आकडेवारी गोळा करून माननीय राज्यपालांना अविचाराने दुरुत्तर पाठवणार्या महाविकास आघाडी सरकारला आता तरी खडबडून जाग येण्याची गरज आहे. साकीनाका येथे झालेल्या एका महिलेच्या निर्घृण हत्येनंतर देशभर खळबळ उडाली होती. 2012 साली राजधानी दिल्लीत झालेल्या निर्भयाकांडाची आठवण करून देणारा हा प्रकार होता. याच घटनेनंतर माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवून राज्यातील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढल्याबद्दल चिंता व्यक्त केली होती. त्यांना उत्तर पाठवताना महाविकास आघाडी सरकारमध्ये बसलेले नेते आपला राजकीय रंग दाखवून गेले. महिलांवरील अत्याचार ही राष्ट्रीय समस्या असून त्याचे राष्ट्रीय पातळीवरच समाधान निघाले पाहिजे अशा अर्थाचे अत्यंत अपरिपक्वपणे लिहिलेले पत्र राज्यपालांकडे धाडण्यात आले. डोंबिवलीसारख्या मध्यमवर्गीय व सुशिक्षित म्हणून ओळखल्या जाणार्या शहरामध्ये गुरुवारी आणखी एक भयंकर प्रकार उघडकीस आला. एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी 23 जणांची धरपकड करण्यात आली. या 23 जणांव्यतिरिक्त आणखी सहा जण फरारी आहेत. असले प्रकार बातम्यांमधून उघडकीस आल्यानंतर कोणालाच ते रुचणारे नसते. रुचणे हा शब्दप्रयोग दूरच राहिला, जनमानसामध्ये एक प्रकारची चीड निर्माण होते. सामान्य माणूस शक्यतो कधीही आपला संताप उघडपणे व्यक्त करत नाही. शेजार्यापाजार्यांमध्ये किंवा परिचयातील वर्तुळात थोडीफार हळहळ व्यक्त करणे होते आणि चार दिवसांनी मामला थंड पडतो. याचा अर्थ सामान्य माणसे असले प्रकार विसरतात असे मात्र नव्हे. जनतेची ही चीड मतपेटीतून व्यक्त होतेच होते. असेच प्रकार चालू राहिले तर महाविकास आघाडी सरकारला जनताच पळता भुई थोडी करेल याची जाणीव सत्ताधार्यांनी ठेवलेली बरी. बलात्कारासारख्या प्रकरणात राजकारण आणणे चुकीचेच आहे. एखाद्या अबलेवर झालेला बलात्कार हा राजकारणाचा मुद्दा होऊ शकत नाही ही भारतीय जनता पक्षाची पूर्वीपासूनचीच भूमिका आहे, परंतु याचा अर्थ जनतेच्या संतापाला वाचाच फोडायची नाही अशी अपेक्षा विरोधी पक्षाकडून करणे चुकीचे ठरेल. डोंबिवलीतील कथित प्रकरण गेले आठ महिने सुरू होते. एका गरीब बिचार्या मुलीवर जो प्रसंग आला तो कोणा वैर्यावर देखील येऊ नये. तथापि सुशिक्षितांच्या शहरामध्ये असल्या प्रकारची निर्घृण घटना आठ महिने घडत राहते आणि पोलीस यंत्रणेला त्याचा सुगावा देखील लागत नाही, हे कशाचे लक्षण आहे? संबंधित दुर्भागी मुलीने ही बाब उघड केल्यानंतर 23 जणांची धरपकड करण्यात आली. येत्या काही दिवसांत हे प्रकरण प्रसिद्धीमाध्यमांमध्ये गाजत राहील. त्यामुळे महाराष्ट्राची अब्रू मात्र धुळीला मिळत राहील. सत्ताधारी आघाडी मात्र इतर राज्यांमध्ये होणार्या महिलांवरील अत्याचारांचा आणि बलात्कारांचा हिशेब गोळा करत राहील. असे किती दिवस चालणार? कुठे ना कुठे हे थांबायला हवे.
Check Also
रामबाग उद्यानाचा रविवारी वर्धापन दिन सोहळा
पारंपरिक लोकगीते व कोळीगीतांचा बहारदार कार्यक्रम पनवेल : रामप्रहर वृत्त दुबईच्या धर्तीवर पनवेल तालुक्यातील न्हावेखाडी …