पनवेल : रामप्रहर वृत्त
महानगरपालिकेतर्फे महिला बालकल्याण विभागांतर्गत प्रशिक्षण आणि मुलींसाठी योजना सुरू करण्यात आल्या आहेत. यामध्ये प्रशिक्षणांतर्गत महिलांना व मुलींना शिवणकाम, ब्युटिशन, फॅन्सी बॅग, पेपरच्या पिशव्या तयार करणे, बेकिंग प्रॉडक्ट, केक तयार करणे असे व्यवसाय प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर राज्य व राष्ट्रीय क्रीडा क्षेत्रात विशेष प्रावीण्य मिळविणार्या मुलींना आर्थिक साहाय्य म्हणून राज्य स्तरावर 15 मुलींना 10,000 रुपये, राष्ट्रीय स्तरावर 25,000 रुपये, तसेच राज्य स्तरावर 10 महिलांना 25,000 रुपये व राष्ट्रीय स्तरावर 50,000 रुपये असे अनुदान देण्यात येणार आहे. वैयक्तिक शिक्षण घेणार्या मुलींना प्रोत्साहनात्मक शिष्यवृत्ती एमबीबीएस शिक्षण घेणार्या 10 महिलांकरिता एक लाख रुपये, तसेच बीएएमएस, बीएचएमएस, बीडीएस पाच महिलांकरिता 50,000 रुपये. त्याचबरोबर अनाथ निराधार मुलांना दत्तक घेतलेल्या 25 लाभार्थी पालकांसाठी प्रोत्साहनात्मक अनुदान 25,000 रुपये देण्यात येणार आहे. पनवेल महानगरपालिकेने गरजू महिलांकरिता व मुलींकरिता या योजना सुरू केल्या आहेत. या सर्व प्रशिक्षण योजनांसाठी उत्पन्नाचा दाखला जोडणे आवश्यक आहे. यासंदर्भात संपूर्ण माहिती पनवेल महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागातून प्राप्त होईल, तसेच योजनांचे सर्व फॉर्म या विभागामध्ये देण्यात येतील. अधिक माहितीसाठी महिला व बालकल्याण विभागाच्या सभापती मोनिका प्रकाश महानवर यांच्या सेक्टर 2, हनुमान मंदिरासमोर, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण येथे असलेल्या जनसंपर्क कार्यलया त संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.