उरण भाजपचे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन
उरण : प्रतिनिधी
रस्ते वाहतूक करताना होणार्या अपघातासंदर्भात उरण तालुक्यातील पूर्व विभागाचे काही प्रश्न सार्वजनिक बांधकाम विभाग उरण येथे भाजप उरण तालुकाध्यक्ष रवी भोईर यांच्या नेतृत्वाखाली बांधकाम विभागाचे अधिकारी ए. आर. सांगळे, सी. बी. बांगर यांच्यासमोर मांडून त्या समस्या सोडविण्याची मागणी करण्यात आली. वाहतूक व अपघातासंदर्भात तसे निवेदनही या वेळी देण्यात आले.
उरण तालुक्यात अपघातात मृत्यूंची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. सर्वसामान्य व्यक्तीला प्रवास करताना अनेक संकटाना तोंड द्यावे लागत आहे. मागील आठवड्यात 21 सप्टेंबर रोजी वशेणी येथील घरातील तरुण संदीप पाटील याचा अपघातात नाहक बळी गेला आहे. घरातील कर्ता पुरुषच गेल्याने अख्ख्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. उरण तालुक्याचा विचार करता आजपर्यंत रस्ते अपघातात 800 पेक्षा जास्त मृत्यू झाले आहेत.
निवेदनात प्रमुख्याने खोपटा पुलाजवळ प्रवेश करण्याच्या अगोदरच्या ठिकाणी गतिरोधक बांधणे, त्याचप्रमाणे कोप्रोली येथील ग्लोबिकॉन कंपनीजवळ गतिरोधक बांधणे, सिद्धी विनायक हॉस्पिटल येथेही गतिरोधक बांधणे, कॉन्टिनेंटलजवळील पुलाला लागून असलेले डिवायडर बंद करणे, कॉन्टिनेंटल ब्रिजजवळील वळण बंद करणे, मुख्य रस्त्यावर विजेचे खांब, डिवायडर येथे तसेच मुख्य रस्त्यावर वाढलेली झाडेझुडपे त्वरित तोडणे, अशा विविध मागण्या करण्यात आल्या. या वेळी भाजप पूर्व विभाग अध्यक्ष शशीकांत पाटील, वाहतूक सेल तालुकाध्यक्ष सुदेश पाटील, युवा विभाग सचिव कल्पेश म्हात्रे, कोप्रोली कार्याध्यक्ष निलेश पाटील, कोप्रोली शाखा चिटणीस प्रितम म्हात्रे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.