खालापूर : प्रतिनिधी
तालुक्यातील बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील सोंडेवाडी येथे रविवारी (दि. 21) वनौषधी, संशोधन व संवर्धन प्रतिष्ठान या सामाजिक संस्थेने आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते. या वेळी आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधांचे वाटप करण्यात आले, मात्र ती सर्व औषधे मुदत संपलेली असल्याचे ग्रामस्थांच्या जागृतेमुळे उघड झाले, यामुळे पुढील संभाव्य धोका टाळला आहे.
खालापुरातील वनौषधी, संशोधन व संवर्धन प्रतिष्ठान तर्फे दर महिन्याला आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात येतात. रविवारी सकाळी सोंडेवाडी येथे असेच शिबिर घेण्यात आले होते. संस्थेच्या वतीने दोन डॉक्टरांनी आदिवासी बांधवांची आरोग्य तपासणी केली आणि आजाराच्या निदानानुसार संस्थेने आणलेली औषधे रुग्णांना दिली. या वेळी बोरगाव ग्रामस्थ शिबिराच्या ठिकाणी पोहोचले. त्यांनी वाटप केलेली औषधे बारकाईने पहिली असता, ती कालबाह्य झालेली आढळली. ग्रामस्थांनी त्वरित ही बाब संस्थेचे कर्मचारी आणि डॉक्टरांच्या निदशर्नास
आणून दिली.
बोरगाव ग्रामस्थांनी खालापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिलकुमार शहा यांना घटनेची माहिती दिली. डॉ. शहा हे सहकारी सुधीर जोशी, सचिन चव्हाण, केसरीनाथ घरत यांच्यासह सोंडेवाडीत दाखल झाले. त्यांनी शिबिरात वाटप करण्यात आलेल्या औषधांची तपासणी केली असता, ती सर्व मुदत संपलेली आढळून आली. ग्रामस्थांनी पेण येथील अन्न औषधे प्रशासन कार्यालयालाही या घटनेची माहिती दिली आहे.
शिबिरात वाटप करण्यात आलेल्या 40 टक्के औषधांची मुदत संपल्याचे आढळून आले. यामध्ये लहान मुलांचीही औषधे आहेत. येथे औषधांचा साठा आढळून आला आहे.
-अनिल कुमार शहा, वैद्यकिय अधिकारी,
खालापूर
शिबिरासाठी आणलेली औषधे वर्गीकरण करून न आणल्याने घोळ झाला. यापुढे दक्षता घेतली जाईल.
-बाळकृष्ण मोकल,
विश्वस्त, वनौषधी प्रतिष्ठान