पनवेल : बातमीदार : दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने सराफ दुकानात जाऊन दुकानदाराची नजर चुकवून दागिने चोरणार्या दाम्पत्याला सराफचालकांनीच पकडून पोलिसांच्या स्वाधीन केल्याची घटना खारघरमध्ये घडली. राजीव विजय पांडेय (28) आणि ममता राजीव पांडेय (22) असे या दाम्पत्याचे नाव असून या दोघांनी खारघरमधील अन्य दोन सराफांनाही फसविल्याचे उघडकीस आले आहे. त्यानुसार खारघर पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली आहे.
पुरणसिंग राजावत हा खारघर सेक्टर 13मधील राजलक्ष्मी ज्वेलर्समध्ये कामाला आहे. पांडेय दाम्पत्य हे शिळफाटा येथील लोढा हेवन इमारतीत राहते. हे दाम्पत्य दोन मुलांसह राजलक्ष्मी ज्वेलर्समध्ये दागिने खरेदी करण्याच्या बहाण्याने गेले होते. त्यावेळी पांडेय दाम्पत्याने नाकातील नथ बघताना संधी साधून त्यातील 24 नगचे नथीचे पाकीट चोरले. त्यानंतर या दाम्पत्याने एक नथ खरेदी करून दुकानातून काढता पाय घेतला. यानंतर दुकानातील कर्मचारी दुकान बंद करून गेले. दुसर्या दिवशी कर्मचार्यांनी दुकानातील दागिने तपासले असता त्यातील नथीचे 24 नगचे पाकीट चोरीला गेल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यामुळे कर्मचार्यांनी दुकानातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता पांडेय दाम्पत्याने दागिने चोरल्याचे निदर्शनास आले. पुरणसिंग राजावत याने त्यांच्या ज्वेलर्सच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर चोर दाम्पत्याचा व्हिडीओ व पांडेय दाम्पत्याचे फोटो टाकून सर्व सराफांना सतर्क राहण्यास सांगितले.
त्याच वेळी पांडेय दाम्पत्य खारघर सेक्टर 15मधून गाडीतून दोन मुलांसह जात असताना त्या भागातील काही सराफांना दिसले. त्यामुळे त्यांनी सेक्टर 15मधील चौकात या दाम्पत्याची गाडी अडवून धरली. त्यानंतर याबाबतची माहिती पुरणसिंग राजावत याला दिली. राजावत याने तत्काळ त्या ठिकाणी धाव घेतली. त्यानंतर पांडेय दाम्पत्याला खारघर पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानुसार पोलिसांनी या दाम्पत्याला अटक केली आहे. या दाम्पत्याने खारघर सेक्टर 20मधील विनायक ज्वेलर्स व सेक्टर 13मधील अलंकार ज्वेलर्समध्येदेखील अशाच पद्धतीने दागिने चोरल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे या दाम्पत्याने नवी मुंबईतील अनेक ज्वेलर्स दुकानदारांची फसवणूक केली असावी, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.