Breaking News

दुटप्पी ठाकरे सरकारकडून सूडबुद्धीने शेतकर्यांची वीजतोडणी

वसुली कारवाईवर भाजपचे टीकास्त्र

पनवेल ः रामप्रहर वृत्त

वीज बिल थकबाकी वसुलीसाठी आता महावसुली सरकारने राज्यातील गरीब व मध्यमवर्गीयांच्या खिशावर डल्ला मारण्यास सुरुवात केली असून गरीब वीज ग्राहकांच्या घरात अंधार पसरविण्याचे कारस्थान आखले आहे. धनाढ्य वीज ग्राहकांच्या आणि सरकारी कार्यालयांच्या कोट्यवधी रुपयांच्या थकबाकीकडे दुर्लक्ष करून गरीब कुटुंबांची वीज कापणार्‍या ठाकरे सरकारने आपला जनताविरोधी चेहरा पुन्हा उघड केला आहे, अशी टीका भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली आहे.

राज्यातील सरकारी कार्यालये, ग्रामपंचायती, पाणीपुरवठा योजना, मंत्र्यांचे बंगले, साखर कारखाने, खाजगी फार्म हाऊसमधील वीज बिलांच्या थकबाकीने उच्चांक गाठला असताना त्याकडे दुर्लक्ष करून दुष्काळ, अतिवृष्टी, कोरोना काळातील टाळेबंदीमुळे अगोदरच कंबरडे मोडलेल्या शेतकरी व गरीब कुटुंबांची ठाकरे सरकारने फसवणूक केली आहे. धनिक थकबाकीदारांसाठी अभय योजना राबविणार्‍या आघाडी सरकारने गरीब शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडले, असा आरोपही त्यांनी केला आहे.

दुष्काळ, अतिवृष्टी, वादळांसारख्या नैसर्गिक संकटांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे, तर कोरोना काळातील टाळेबंदीमुळे सामान्य कुटुंबांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. या संदर्भात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मार्च महिन्यात विधिमंडळाच्या अधिवेशनात सरकारला जाब विचारल्यानंतर कृषी पंप आणि घरगुती ग्राहकांच्या वीज तोडणीची कारवाई थांबविण्याचे आश्वासन देण्यात आले, पण अधिवेशनानंतर पुन्हा वीजतोडणीची कारवाई सुरू करून सरकारने सामान्य जनतेचा विश्वासघात केला.

फडणवीस सरकारच्या काळात वीजग्राहकांच्या समस्या लक्षात घेऊन थकबाकी वसुली थांबविली गेली व वीज मंडळास आर्थिक साह्यदेखील केले. तरीही संपूर्ण कर्जमाफी मिळेपर्यंत वीजबिल भरू नका, असा सल्ला देत शरद पवारांसारखे नेते त्या काळात जनतेस भडकावत होते. आता त्यांच्याच आशीर्वादाने ठाकरे सरकारने वसुलीसाठी कारवाई करून लाखो कुटुंबांना वेठीस धरले आहे, अशी टीका आमदार प्रशांत ठाकूर यांनी केली.

एकीकडे शेतकर्‍यांच्या प्रश्नावरील आंदोलनांना पाठिंबा द्यायचा व दुसरीकडे राज्यातील शेतकर्‍यांची वीज तोडायची हा महावसुली सरकारचा दुटप्पीपणा जनतेने आता ओळखला असून तो त्वरित थांबविला नाही, तर जनतेच्या रोषास सामोरे जाण्याची तयारी ठेवा, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

Check Also

सौ. शकुंतला रामशेठ ठाकूर यांना यमुना स्त्री सन्मान पुरस्कार प्रदान

सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव योगदानाचा गौरव पनवेल ः रामप्रहर वृत्तइतिहासात तसेच आजच्या आधुनिक युगातही अनेक …

Leave a Reply