Breaking News

बुडित कर्नाळा बँकेमध्ये ठेवी ठेवणार्‍या उरणमधील 10 ग्रामपंचायतींचे धाबे दणाणले

शासकीय चौकशीमुळे संबंधित सरपंच, ग्रामसेवक अडचणीत

उरण : प्रतिनिधी
परवाना रद्द झालेल्या कर्नाळा बँकेत आपल्या ग्रामपंचायतींनी ठेवलेल्या ठेवी परत मिळविण्यासाठी कोणती उपाययोजना केली याचा अहवाल सादर करावा, असे लेखी आदेश उरण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांनी उरण तालुक्यातील 10 ग्रामपंचायतींना दिले आहेत. त्यामुळे कर्नाळा बँकेत कोट्यवधींच्या ठेवी ठेवणार्‍या या ग्रामपंचायतींच्या सरपंचांचे आणि ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत.
उरण तालुक्यातील चाणजे, धुतूम, चिर्ले, पागोटे, बोकडविरा, भेंडखळ, जासई बांधपाडा, पिरकोन व विंधणे या 10 ग्रामपंचायतींनी नियम धाब्यावर बसवून कर्नाळा बँकेत ग्रामपंचायतींच्या नावाने परस्पर खाती उघडली आणि त्यात कोट्यवधी रुपयांच्या ठेवी ठेवल्या आहेत. कर्नाळा नागरी सहकारी बँकेत जिल्ह्यातील ग्रुप ग्रामपंचायतींनी परस्पर मोठ-मोठ्या रकमा ठेवींच्या स्वरूपात ठेवल्या आहेत. कर्नाळा बँकेचा परवाना रद्द झाल्याने त्यातील ठेवी परत मिळविण्यासाठी संबंधित ग्रामपंचायतींनी आजतागायत काय उपाययोजना केल्या आहेत याची माहिती भाजप उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर आणि जिल्हा परिषद सदस्य अमित जाधव यांनी रायगड जिल्हा परिषदेकडे मागितली आहे.
या पत्राची दखल रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी घेतली. त्यांनी उरणच्या गटविकास अधिकारी नीलम गाडे यांना याबाबत माहिती घेण्याचे आदेश दिले. गाडे यांनी उरण तालुक्यातील कर्नाळा बँकेत ठेवी असलेल्या संबंधित 10 ग्रामपंचायतींनी काय उपाययोजना केली, याचा लेखी अहवाल दोन दिवसांत देण्याचे आदेश दिल्याने संबंधित सरपंच व ग्रामसेवकांचे धाबे दणाणले आहेत. या ग्रामपंचायतींकडून आता काय अहवाल येतो याकडे उरण, पनवेलसह रायगड जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

Check Also

महिंद्रा शोरूमला लागलेल्या आगीत पाच गाड्या जाळून खाक; लाखो रुपयांचे आर्थिक नुकसान

पनवेल: वार्ताहर पनवेल जवळील कोळखे येथील महिंद्राच्या शोरूमला आग लागल्याची भीषण घटना गुरुवारी (दि. 20) …

Leave a Reply