माजी आमदार विवेक पाटील 11 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्येच
पनवेल ः विवेक पाटील यांचा पुन्हा एकदा जामीन फेटाळून न्यायालयाने त्यांना 11 ऑक्टोबरपर्यंत जेलमध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आता आमचे साहेब तुरुंगातून सुटणारच, अशा गमजा मारणारा मेसेज सोशल मीडियावर वरचेवर पाठवणार्या शेकाप कार्यकर्त्यांच्या बाता हवेत विरून गेल्या आहेत.
विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीची मुदत मंगळवारी (दि. 28) रोजी संपत होती. त्यांना तळोजा जेलमधून व्हिडीओ कॅान्फरन्सद्वारे सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) न्यायालयासमोर पुन्हा उपस्थित केले. ईडीचे असिस्टंट डायरेक्टर सुनीलकुमार यांनी विवेक पाटील यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करावी, अशी मागणी केली. न्यायालयाने ती मागणी मान्य करून विवेक पाटील यांना 11 ऑक्टोबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
कर्नाळा बँकेतील साडेपाचशे कोटी रुपयांच्या घोटाळ्यात गुंतलेले शेकाप नेते आणि माजी आमदार विवेक पाटील हे येत्या 28 सप्टेंबरला जेलमधून सुटतील. अशी भाबडी अपेक्षा शेकाप कार्यकर्ते सोशल मीडियावर अतिउत्साहात व्यक्त करीत होते, मात्र न्यायालयाच्या निर्णयाने त्यांच्या भ्रमाचा भोपळा पुन्हा एकदा फुटला आहे.
फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक झालेल्या विवेक पाटील यांच्यासह या गुन्ह्यात सहभागी असलेल्या इतर सर्वांना कधी अटक होणार आणि आमचे पैसे कधी परत मिळणार या आशेवर कर्नाळा बँकेचे खातेदार आणि ठेवीदार वाट पाहात आहेत. आतापर्यंत कोणत्याही खातेदारांना आणि ठेवीदारांना त्यांच्या बुडालेल्या पैशांपैकी एकही पैसा परत मिळालेला नाही.
विवेक पाटील यांची आता सुटका होणार, असा समज करून मनात मांडे खाणार्या शेकाप नेते आणि कार्यकर्त्यांना मात्र आता पुन्हा एकदा निराशेला सामोरे जावे लागले आहे. विवेक पाटील यांनी घोटाळा केल्याने आता कर्नाळा बँकेच्या खातेदारांना पैसे कसे परत करणार हे स्पष्ट करणारी कोणतीही स्वतःची योजना विवेक पाटील, त्यांचे या घोटाळ्यातील सहकारी आणि जनतेची मते मागणार्या शेकाप नेत्यांनी आतापर्यंत जाहीर केलेली नाही.
याउपर शेकापचे विधान परिषदेचे सदस्य बाळाराम पाटील यांनी तर यापूर्वी असे वक्तव्य केले होते की, आमचे साहेब (विवेक पाटील) बाहेर आल्यावर आम्ही अशी फटाकेबाजी करू की तुमच्या कानठळ्याच बसतील. त्यांच्या या वक्तव्यामुळे संतापलेल्या कर्नाळा बँकेच्या खातेदारांनी बाळाराम पाटील यांना असा प्रश्न केला आहे की, जेव्हा आपल्याच पक्षाचे माजी आमदार विवेक पाटील हे कर्नाळा बँकेचे खातेदार आणि ठेवीदारांचे पैसे बुडवण्याचे उद्योग करीत होते तेव्हा तुम्ही त्यांना का रोखू शकला नाहीत. तुम्ही तेव्हा त्यांना रोखले असते, तर त्यांच्यावर (विवेक पाटील यांच्यावर) जेलमध्ये जाण्याची वेळच नसती आली आणि कानठळ्या बसवणारे फटाके वाजवू, असेही आपल्याला बोलावे लागले नसते.
एकीकडे शेकापच्या नेत्यांनी कर्नाळा बँक राजरोसपणे लुटायची, दुसरीकडे कर्नाळा बँकेतील सामान्य ठेवीदारांकडून त्यांच्याच ठेवीवरील इन्श्युरन्सचे फॉर्म भरून घ्यायचे आणि त्यांना आपणच पैसे परत करत आहोत, असे भासवायचे हा शेकापचा दुटप्पीपणा आता संपूर्ण रायगड जिल्हा ओळखून आहे.
कर्नाळा बँकेच्या माध्यमातून सामान्य ठेवीदार आणि खातेदारांच्या पैशांची विवेक पाटील आणि त्यांच्या सहकार्यांनी लूट केली आणि या घोटाळ्यातून हाती आलेले पैसे हे आपल्या जवळच्या शेकाप कार्यकर्त्यांना निवडणुकीत वापरायला दिले. सामान्य कष्टकर्यांच्या पैशावर निवडणुका लढवून अवैध मार्गाने गब्बर झालेले शेकाप नेते आणि कार्यकर्ते हे सामान्य माणसाला विचारानेसे झाले. त्यामुळे भोळ्याभाबड्या जनतेचे शाप आता विवेक पाटील यांच्यासह शेकापलाही भोगावे लागत आहेत.