Breaking News

मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे चर्चा फिसकटली; सिडको घेराव आंदोलनावर कृती समिती ठाम

मुंबई ः रामप्रहर वृत्त

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी घोषित करण्यात आलेले 24 जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन कोणत्याही परिस्थितीत होणारच आहे. नामकरणासंदर्भात रविवारी (दि. 20) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबत झालेली लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीची चर्चेची दुसरी फेरीही मुख्यमंत्र्यांच्या हट्टामुळे फिसकटली. मुख्यमंत्र्यांनी शिष्टमंडळाचे म्हणणे ऐकून न घेता ते बैठकीतून एकदा उठून गेले. त्यामुळे काहीही झाले तरी ‘दिबां’च्या नावासाठी आम्ही माघार घेणार नाही, असा निर्धार सर्वपक्षीय कृती समितीने व्यक्त केला आहे. मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी झालेल्या या बैठकीला राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे, नवी मुंबईचे पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंग, सिडकोचे एमडी संजय मुखर्जी, सर्वपक्षीय कृती समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, जगन्नाथ पाटील, कार्याध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार गणपत गायकवाड, तसेच संतोष केणे, गुलाब वझे, जे. डी. तांडेल, दीपक म्हात्रे, भूषण पाटील, दशरथ भगत, मनोहर पाटील, विनोद म्हात्रे, मेघनाथ म्हात्रे आदी उपस्थित होते. या वेळी कृती समितीच्या शिष्टमंडळाचे ऐकून न घेता, चर्चा न करताच मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेल्याने सर्वपक्षीय कृती समितीने 24 जूनचे आंदोलन कोणत्याही परिस्थितीत करणारच, असा निर्धार केला आहे. भूमिपुत्र, शेतकरी, प्रकल्पग्रस्त, कष्टकर्‍यांचे झुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानतळाला देण्यात यावे, या मागणीसाठी लोकचळवळ उभी राहिली आहे. सर्व स्तरांतून तिला पाठिंबा मिळत आहे. खरंतर ही मागणी सन 2008पासूनची आहे. असे असताना राज्यातील ठाकरे सरकारने शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांचे नाव या विमानतळाला देण्यात येईल, असे जाहीर केले असून तसा ठराव राज्याचे नगरविकासमंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिडकोमार्फत करून घेतला आहे. त्यास रायगड, ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांतील ‘दिबा’प्रेमी नागरिकांचा तीव्र विरोध आहे. हा असंतोष 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनातून स्पष्टपणे दिसून आला. तरीही शिवसेनेचे नेते हे बाळासाहेब ठाकरे यांचेच नाव विमानतळाला देण्यात येईल, असे सांगत असून 24 जूनचे आंदोलन दडपण्यासाठी जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत, मात्र त्यांचा हा डाव यशस्वी होणार नाही, असे लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समितीने म्हटले आहे. या संदर्भात प्रतिक्रिया देताना लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी म्हटले की, नवी मुंबई पोलीस आयुक्तांनी बोलाविलेल्या या बैठकीत आम्ही सर्वपक्षीय कृती समितीने विमानतळाला दि. बा. पाटील यांच्या नावाचा आग्रह धरला, मात्र चर्चा सुरू होण्यापूर्वीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विमानतळाव्यतिरिक्त दुसरे कुठे नाव सुचवायचे असेल तर सुचवा, असे म्हटले, पण आम्ही आताही ‘दिबां’च्या नावावर ठाम असल्याचे स्पष्ट केले. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी तुम्ही असा आग्रह धरत असाल तर आमचे शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, असे सांगितले. एकीकडे त्यांनी आपल्या पक्षाच्या वर्धापन दिन कार्यक्रमात ममता बॅनर्जी व त्यांच्या कार्यकर्त्यांनी पश्चिम बंगालमध्ये अस्मिता जपण्याचे उचललेले पाऊल अभिनंदनीय असल्याचे म्हटले आणि दुसरीकडे मात्र ते पनवेल, उरण, रायगडसह कोकणची जनता जी अस्मिता जपतेय तिला नाकारतात. ‘दिबां’च्या नावासाठी 27 सूचना गेलेल्या असताना तुम्ही नाव सुचविले नाही, सरकारने नाव सुचविले नाही, असे सांगता. वास्तविक सिडकोकडे प्रकल्पग्रस्तांच्या व त्यांच्या संघटनांच्या अनेक सूचना गेलेल्या आहेत. सिडको संचालक मंडळात ठराव झाला नाही हा पुढचा भाग आहे. तो या विमानतळाचे काम पूर्ण होईल तेव्हा करता येईल, पण म्हणून एवढ्या लवकर नामकरण उरकून घेणे योग्य नाही. दरम्यान, 24 जूनच्या सिडको घेराव आंदोलनाची जोरदार तयारी सुरू असून, त्या अनुषंगाने घेण्यात येत असलेल्या विभागनिहाय बैठकांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचे दिसून येत आहे. ‘आमच्या मनानं घेतलाय ठाव, विमानतळाला दिबांचंच नाव!,’ अशी ठाम भूमिका ‘दिबा’प्रेमी जनतेने घेतली आहे. किमान एक लाख लोकांचा या आंदोलनात सहभाग असणार आहे. शांततापूर्ण स्वरूपात हे आंदोलन केले जाणार असून त्या दृष्टीने नियोजन व तयारी केली जात आहे.

आंदोलन यशस्वी होणारच -लोकनेते रामशेठ ठाकूर

लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई विमानळाला देण्याच्या मागणीसाठी भूमिपुत्र एकवटले आहेत. त्यामुळे 24 जून रोजीचे सिडको घेराव आंदोलन यशस्वी होणारच. ‘दिबां’ची अस्मिता जपण्यासाठी सर्व भेद बाजूला करून सज्ज होऊ या, असे आवाहन लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी केले. ते पुढे म्हणाले की, प्रशांत ठाकूर, महेश बालदी व गणपत गायकवाड या तिन्ही आमदारांनी पोलीस आयुक्तांना स्पष्ट शब्दांत सांगितले की, आम्हाला अडवायचा प्रयत्न केल्यास आम्ही आत्मदहनाची वेळ आली तरी मागे हटणार नाही. आम्ही आंदोलनस्थळी जाणारच आणि तुम्ही जाऊ दिले नाही, तर रस्त्यात जे काही होईल त्यास तुम्हीच जबाबदार असाल.

शिवसेनेची दुटप्पी भूमिका

लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावासंदर्भात विषय निघाला तर शिवसेनेचे रायगड जिल्हा सल्लागार बबन पाटील आणि जिल्हाध्यक्ष शिरीष घरत म्हणतात की, तुम्ही केंद्रात जाऊन केंद्र सरकारकडून दि. बा. पाटील यांचे नाव मंजूर करून आणा. आमचा त्याला पाठिंबा असेल, मात्र हीच मंडळी सिडकोने केलेल्या ठरावाला पाठिंबा देतात आणि राज्य सरकारकडे सिडकोच्या ठरावाचा आग्रह धरतात. म्हणजे एका बाजूला सांगायचे तुम्ही दिल्लीला जाऊन नाव मंजूर करा आणि दुसर्‍या बाजूला यांनी सिडकोकडून ठराव करून आमच्या पायात पाय घालायचा. हे असे उद्योग का करता? आम्ही तर दि. बा. पाटील यांचे नाव मंजूर करून घेऊच. कारण आमच्या भूमिकेवर आम्ही ठाम आहोत, असेही सर्वपक्षीय कृती समितीने ‘दिबा’विरोधी मंडळींना सुनावले आहे.

नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांच्या नावाशिवाय दुसरा पर्याय नाही, असे आम्ही मुख्यमंत्र्यांना पुन्हा एकदा स्पष्टपणे सांगितले. यावरून त्यांचा संताप झाला आणि ते बैठकीतून निघून गेले. ही बाब बरोबर नाही. त्यांनी लोकभावना समजून घेतल्या पाहिजेत. सरकारनेही याचा गांभीर्याने विचार करावा.

-दशरथ पाटील, अध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

मुख्यमंत्री बैठकीतून निघून गेले हे महाराष्ट्रातील पहिले उदाहरण आहे. 1960 साली राज्याची स्थापना झाली. त्या वेळी मुख्यमंत्री झालेले यशवंतराव चव्हाण ते देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत कुणीही राज्यातील एखाद्या प्रकल्पाला आपल्या आई-वडिलांचे नाव द्यावे, असे सांगितलेले नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनीही आपल्या पिताश्रींच्या नावाचा आग्रह धरू नये.

-जगन्नाथ पाटील, सल्लागार, सर्वपक्षीय कृती समिती

24 जूनचे आंदोलन करायचे हा आपला निर्धार पक्का आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र तुम्ही आंदोलन करीत असाल, तर शिवसैनिकही रस्त्यावर उतरतील, अशी भाषा केली. अशा प्रकारे मुख्यमंत्री धमकी देतात हा लोकनेते दि. बा. पाटील व त्यांच्या कार्याचा अपमान आहे. त्यामुळे सर्वसामान्य जनता याविरोधात रस्त्यावर उतरेल. पोलिसांच्या आडून हे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होईल, पण आपण ठाम राहायला हवे.

-आमदार प्रशांत ठाकूर, कार्याध्यक्ष, सर्वपक्षीय कृती समिती

सर्वपक्षीय कृती समितीत जे ठरेल ते निर्देश आपल्याला पाळायचे आहेत. पोलिसांनी आंदोलनाला जाऊ नका, गुन्हे दाखल होतील, असे म्हटले आहे, पण श्रद्धेय दि. बा. पाटील यांच्यामुळे आपल्याला चांगले दिवस दिसले. म्हणूनच घेराव आंदोलनातून महाराष्ट्र सरकारची झोप उडविण्यासाठी सज्ज राहा.

-आमदार महेश बालदी, सदस्य, सर्वपक्षीय कृती समिती

मुख्यमंत्र्यांनी लोकभावना लक्षात घेतल्या पाहिजेत, मात्र ते बैठकीतूनच उठून गेले. आता भूमिपुत्रांनी आपली अस्मिता जपण्यासाठी एकत्र आले पाहिजे. सरकार आपले आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करेल, पण आपण ठाम राहिले पाहिजे. नाहीतर पुढील पिढीला अपमानित जीवन जगावे लागेल, न्याय्य हक्कांसाठी झगडावे लागेल. हीच ती वेळ आहे की आपण ‘दिबा’विरोधकांना आणि सरकारला त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.

-आमदार गणपत गायकवाड

Check Also

केळवणे येथे आमदार महेश बालदींच्या प्रचाराचा शुभारंभ

पनवेल : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्ष केळवणे येथे उरण मतदार संघाचे दमदार आमदार महेश …

Leave a Reply