राष्ट्रवादीचा शेकापला टोला
माणगाव ः प्रतिनिधी
काळी कर्म करणार्यांचे अंतर्मन काळे असते. म्हणूनच त्यांना सारे जग नेहमी काळे दिसते. पालकमंत्र्यांचा राजीनामा मागणार्यांंनी आपली उंची पहावी, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे माणगाव तालुका अध्यक्ष सुभाषशेठ केकाणे यांनी शेकापचे तालुका चिटणीस रमेश मोरे यांचे नाव न घेता त्यांना पत्रकार परिषदेत बोलताना टोला लगावला.
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पूरग्रस्तांसाठी आलेली मदत माणगाव तालुक्यातील अंगणवाड्यांना वाटली या विरोधकांच्या वृत्ताचे खंडन करताना राष्ट्रवादीचे अध्यक्ष केकाणे यांनी सोमवारी (दि. 4) माणगाव येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत तटकरे कुटुंबीय, सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामगिरीचा लेखाजोखा मांडत शेकापवर निशाणा साधला.
या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शेखरशेठ देशमुख, इकबालशेठ धनसे, प्रदेश युवक सचिव दीपक जाधव, महिला आघाडी तालुकाध्यक्ष संगीता बक्कम, माणगाव शहराध्यक्ष महामूद धुंदवारे, इंदापूर विभागीय अध्यक्ष काका नवगणे, मोर्बा विभागीय अध्यक्ष अब्दल्ला गंगरेकर, माजी उपनगराध्यक्ष रत्नाकर उभारे, तालुका युवक अध्यक्ष रूपेश तोडकर, महिला आघाडीच्या तालुका उपाध्यक्ष श्रद्धा यादव, इंदापूर विभाग अध्यक्ष संगीता चव्हाण, किशोरी हिरवे, उणेगावचे सरपंच राजेंद्र शिर्के, मोर्बा ग्रामपंचायतीचे उपसरपंच इकबाल हर्णेकर, संतोष यादव आदी उपस्थित होते.
सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामार्फत काम होत असताना विरोधक त्यावर टीका करीत असेल तर ते यापुढे कदापि सहन केले जाणार नाही, असा इशारा शेवटी केकाणे यांनी शेकापला दिला.