यवतमाळमध्ये विविध मागण्यांसाठी शिवसैनिक रस्त्यावर
यवतमाळ : प्रतिनिधी
यवतमाळमधील नेर तालुक्यातील शिवसैनिक पावसामुळे पिकांचे नुकसान झालेल्या शेतकर्यांना राज्य सरकारने तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, ओला दुष्काळ जाहीर करावा या मागणीसाठी रस्त्यावर उतरल्याचे समोर आले आहे. तर या प्रकरामुळे राज्यातील ठाकरे सरकारला या शिवसैनिकांकडून एकप्रकारे घरचा आहेरच दिला गेल्याचे बोलले जात आहे.
पावसामुळे खरीप हंगामातील पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, मूग पिक हातातून गेले असून, शेतकरी संकटात आहे. या नुकसानामुळे कर्जाचा बोजा आणखीच वाढणार आहे. कोरोना काळात शेतकर्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागले. कर्ज, उसनवारी करून शेतकर्यांनी पेरणी केली. सुरुवातीला पीक-पाणी चांगले होते, मात्र पावसामुळे होत्याचे नव्हते झाले. राज्य सरकारने शेतकर्यांना तत्काळ नुकसान भरपाई द्यावी, या मागणीचे निवेदन नेर तालुक्यातील शिवसेना तालुका प्रमुख मनोज नाल्हे, दीपक आडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना जिल्हाधिकार्यांमार्फत पाठविले आहे.
शिवसैनिकांनी रस्त्यावर उतरून ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, शेतकर्यांना न्याय मिळालाच पाहिजे, शेतकर्यांना मदत मिळालीच पाहिजे. अशा घोषणा दिल्या. या वेळी त्यांच्या हाती मागण्यांचे फलक व झेंडेदेखील होते.
नेर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची माहिती शासनाला देण्यासाठी आम्ही तहसील कार्यालयात आलो आहोत. सततच्या पावसाने कृषी व्यवसाय डबघाईला आलेला आहे. शेतकरी अतिशय संकटात सापडलेला आहे. त्या शेतकर्याला न्याय देण्यासाठी आपल्या हक्काच्या सरकारला माहिती देण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. शेतीचे नुकसान झालेले आहे, परंतु किती प्रमाणात झाले? काय झाले? याचा डाटा इथे तयार नाही, म्हणून आम्ही शिवसैनिकांच्या माध्यमातून प्रत्येक गावात शेतकर्यांचे नाव, त्यांचा सर्वे नंबर, क्षेत्रफळ, शेतातील पीक आणि झालेले नुकसान याबाबतची माहिती आम्ही इथे जमा केली आहे.ही सर्व माहिती घेऊन मुख्यमंत्र्यांना देण्यासाठी नेर तहसीलला आलो आहोत. जेणेकरून नुकसानग्रस्त शेतकर्यांना शासकीय मदत मिळू शकेल. या निवेदनाचा मुख्यमंत्री विचार करतील आणि तालुक्याला भरघोस मदत करतील अशी आम्ही आशा व्यक्त करतो. असे शिवसेना तालुका प्रमुख मनोज नहल्ले यांनी सांगितले आहे.